पणजी : महानगरपालिकेतर्गत शहरात सुरू असलेल्या पे-पार्कींग सुविधेमध्ये गैरप्रकार सुरू असून पर्यटकांकडून अवाजवी भाडेआकारणी अद्याप थांबलेली नाही. राजधानीतील अनेक ठिकाणी पे-पार्कींग बोर्ड लावले नसून काही ठिकाणी लावलेल्या बोर्डवरील दर कळू नये यासाठी काही भाग फाडण्यात आला आहे. यावर पालिकेचे नियंत्रण नसल्याची तक्रार वाहनचालक करत आहेत.
पे-पार्किंगमध्ये चारचाकीला एका तासासाठी २० रुपये दर लागू होतो, तर दुचाकीला पूर्ण दिवसासाठी १५ रुपये भाडे आहे. मात्र पार्किंग दर गोळा करणाऱ्या कामगारांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले. पार्किंग दराबाबत चौकशी केली असता, अनेकदा चालकांना चुकीची माहिती दिली जाते. तसेच एका कामगाराने ज्यादा पैसे कमवण्यासाठी आम्ही पर्यटकांना ज्यादा भाडे आकरतो, असे उघडपणे सांगितले. यातून पालिकेचे दुर्लक्ष अधोरेखित झाले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून महापौरांनी याबाबत चौकशी करावी, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.
आठवडाभरपूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये नगरसेवकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. जिथे-जिथे पार्किंग दर आकारले जातात तिथे अनेक ठिकाणी अद्याप दराचे बोर्ड लावण्यात आलेले नाहीत. तसेच इमारतींमधील रहिवाशांना पार्किंग पासही देण्यात आलेला नाही. यावेळी असे गैरप्रकार थांबण्यासाठी पार्किंगची निविदा दिलेल्या व्यक्तीसोबत चर्चा करून हा मुद्दा मार्गी लावणार, असे आश्वासन महापौर रोहीत मोन्सेरात यांनी दिले होते. मात्र अद्याप यामध्ये कोणतीच हालचाल झालेली नाही.
पणजी पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये मी पार्किंगच्या मुद्द्यावर महापौरांचे लक्ष वेधले होते. पार्किंग फी आकारणारे कामगार गैरप्रकार करून पर्यटकांकडून नियमित दराच्या पाचपट भाडेआकारणी करतात. तसेच स्थानिक वाहन चालकांकडूनही दुप्पट भाडे आकारणी करत असल्याचे उघडकीस आले आहे. हे प्रकार थांबले नाहीत तर पालिकेची प्रतिमा मलीन होऊ शकते, असे माजी महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.