मडगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरातील ऐतिहासिक व गजबजलेल्या गांधी मार्केट परिसरात जुन्या मीट शॉप इमारतीचा काही भाग रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने दुर्घटनेच्या वेळी परिसरात विक्रेते किंवा ग्राहक उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गांधी मार्केटमधील स्वच्छतागृहाजवळ असलेल्या जुन्या मीट शॉप इमारतीचा एक भाग रविवारी पहाटे सुमारे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास कोसळला. पहाटे बाजारपेठेत आलेल्या काही विक्रेत्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने स्थानिक प्रतिनिधी राजेंद्र आजगावकर यांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच आजगावकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि याबाबत मडगाव नगरपालिका प्रशासनाला माहिती दिली. दरम्यान, पहाटे इमारतीचा एक भाग कोसळल्यानंतर सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्याच बांधकामाच्या दुसऱ्या बाजूचा मोठा भागही खाली कोसळला. मात्र, इमारत धोकादायक स्थितीत असल्याचे लक्षात आल्याने पालिका व स्थानिक प्रशासनाने विक्रेत्यांना त्या भागात बसण्यास आधीच मनाई केली होती.