पणजी : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसने पणजी मतदारसंघातील मतदार यादी पुनर्तपासणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. अपात्र नावे शोधण्यात अधिकारी अपयशी ठरल्याचे आणि विशेष सखोल पुनर्तपासणी (एसआयआर) दरम्यान काँग्रेसच्या खऱ्या मतदारांना वगळण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अमित पालेकर यांनी आरोप केला की, बनावट किंवा अपात्र मतदारांच्या उपस्थितीमुळे मतदार याद्यांमध्ये नावांचा समावेश करणे हे लोकप्रतिनिधित्व कायदा आणि फौजदारी कायद्यानुसार गुन्हा ठरू शकतो.
एसआयआर प्रक्रियेदरम्यान अशी नावे कशी काय नजरेतून सुटली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रक्रियेसाठी जबाबदार असलेल्या नोकरशहांना जबाबदार धरले जाईल, असे पालेकर म्हणाले.
जर अनियमितता सिद्ध झाली, तर काँग्रेस मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी घेऊन जाईल आणि आढळलेल्या कथित बनावट प्रतिज्ञापत्रांवर कारवाईची मागणी करेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, जीपीसीसीचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी आरोप केला की भाग १०, १६ मधील बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) आणि पणजी मतदारसंघातील १८ जण स्थानिक आमदार आणि महसूल मंत्री बाबूल मॉन्सेरात आणि भाजप नेत्यांच्या दबावाखाली होते.
कवठणकर यांनी असा दावा केला की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे स्वतंत्रपणे पालन करू देण्याऐवजी बीएलओंवर प्रभाव टाकला जात आहे. काँग्रेसने या कथित हस्तक्षेपाचा निषेध केला आणि अधिकाऱ्यांनी विहित निवडणूक प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करावे अशी मागणी केली.
भाजप फसवगिरीने निवडणूक जिंकते. पण असे होता नये. ते रोखायला हवे. मतदानासाठी थापा तारी होतो, गुरखा डिसोजा होतो. नाव बदलण्याचे हे प्रकार थांबायला हवेत, असे कवठणकर म्हणाले.
मतदार याद्यांच्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरावलोकनावर (एसआयआर) प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री बाबुश मॉन्सेरात म्हणाले की, निवडणूक आयोग पणजी मतदारसंघातील मतदार याद्यांची छाननी आणि निवडणूक प्रक्रियेत उल्लंघन किंवा हस्तक्षेप करण्यास जबाबदार आढळलेल्यांवर कारवाई करेल. निवडणूक आयोग एसआयआर प्रकरणाची तपासणी करेल व योग्य तो निर्णय घेतला जाईल.
हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येते आणि एसआयआर प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या चिंतेवर निवडणूक प्राधिकरण लक्ष देईल, असे त्यांनी सूचित केले. पणजी मतदारसंघातील मतदार याद्यांच्या पुनर्तपासणीत अनियमितता झाल्याच्या काँग्रेसच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टिप्पणी केली आहे.- बाबुश मॉन्सेरात (महसूल मंत्री)