पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजी बाजारात या रविवारी भाज्यांचे दर स्थिर होते. बटाटा ४० रुपये किलो असून कांदा, टोमॅटोचा दर ३० रुपये किलो होता. तो आता ३५-४० रुपये झाला आहे. फलोत्पादन महामंडळाच्या स्टॉलवर कांदा, बटाटा, टोमॅटो अनुक्रमे २३, २४, २७ असा दर आहे. या रविवारी थोडी किंमत कमी झाली.
कांद्याचा दर मात्र बाजारात याही रविवारी ४० रु. आहे. आले व लसूणचा दर मात्र दोन्ही ठिकाणी वाढलेलाच दिसला. बाजारात लसूण २५० ते ३२० रु. किलो, तर फलोत्पादनकडे २२५ रु.दर आहे. आल्याचा दर बाजारात १६० तर फलोत्पादनकडे १०० रुपये आहे. सध्या बाजारात गावठी भाजी मोठ्या प्रमाणावर येत आहे.
त्यात वाली, चवळीचा पाला, मुळा व लाल भाजी, शेवग्याच्या शेंगा यांचा समावेश अधिक आहे. यामुळे व्यापारी बाजारपेठेतील भाज्यांपेक्षा या भाज्यांना लोक अधिक पसंती देत आहेत. अनेक स्थानिक शेतकरी या भाज्या आपल्या शेतात पिकवत आहेत. चवळीचा पाला ५० रुपये वाटा, वाली ५० ला २ ते ३ पेंड्या, मुळा, लाल भाजीच्या १५ ते २० रुपयांना पेंडी मिळत आहे.