Panjim Muncipal Corporation 
गोवा

Panaji Municipal Election 2026 | पणजी महापालिका निवडणूक शांततेत

Panaji Municipal Election 2026 | अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती; मतदारांत उत्साह

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी महापालिकेच्या ३० प्रभागांसाठी सकाळपासून ४८ मतदान केंद्रावर मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या. मात्र, त्यानंतर दुपारपर्यंत ही गर्दी कमी झाली. मतदान सुरळीत व शांततेने सुरू होते. पणजीतील एका मतदान केंद्रावर प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला.

मतदान केंद्रावर उत्पल पर्रीकर तसेच मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे कार्यकर्ते देखरेख ठेवून असल्याचे दिसून आले. या निवडणुकीत प्रभाग आरक्षणात बराच बदल झाला असल्याने मंत्री मोन्सेरात व उत्पल पर्रीकर यांच्या पॅनलमधील उमेदवारांमध्ये काही प्रभागात अटीतटीच्या लढती दिसून येत आहे.

आज सकाळी ८ ते १९ पर्यंत १६.८३ टक्के मतदान झाले होते. मतदारांत उत्साह असल्याने पूर्वपिक्षा यावेळी अधिक मतदान होण्याची चिन्हे सकाळपासूनच दिसत होती. दुपारी १२ वाजेपर्यंत ३३.६४ टक्के झाले होते, त्यापैकी प्रभाग १ व १२ मध्ये ४० टक्क्यांहून मतदान झाले होते. दुपारी २ वाजेपर्यंत ४७.३४ टक्के मतदान झाले होते. त्यात प्रभाग १, २, ९,१२, १३, १४, १८, १९, २१, २३, २७, २८ मध्ये ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते.

संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ६२.२४ टक्के मतदान झाले होते. मतदारांनी विकासाला की झालेल्या समस्यांचा राग या मतदानातून काढला आहे ते येत्या १३ तारखेला मतमोजणीवेळी दिसून येईल. या निवडणुकीत दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे. मंत्री मोन्सेरात यांनी तर ३० ही जागा जिंकू असा दावा केलेला आहे.

महापालिका प्रभागांची फेररचना झाली असल्याची माहिती मतदारांना नाही. त्यांची नावे कोणत्या प्रभागामध्ये आहेत, याची त्यांनाच माहिती नाही. त्यामुळे पूर्वी केलेल्या मतदान केंद्रांवरील नावे इतर प्रभागात समावेश केली असल्याने त्यांना नावे शोधण्यासाठी धावपळ करताना दिसत होते. या फेररचनेबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त करताना दिसत होते.

ही परिस्थिती दोनापावला येथील प्रभाग १ ब २ मध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची अदलाबदल झाल्याचे दिसून आले. पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी मतदान केंद्रावर फेरफटका मारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात अनेक कामे पणजी शहरात झाली आहेत. आमच्या पॅनलमधील उमेदवारांची स्थिती चांगली आहे व जिंकरण्याचा विश्वास आहे.

लोकांनी भावनेच्या भरात मतदान करू नका तर योग्य उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने मतदानास उपस्थिती लावली आहे, ही चांगली गोष्ट आहे. मतदारांनी आपला हक्क बजावून योग्य उमेदवाराला निवडून आणावे, असे आवाहन उत्पल पर्रीकर यांनी केले. मतदान सुरळीतपणे सुरू आहे व मतदानाची गती काहीशी कमी दिसून येत असल्याचे उत्पल पर्रीकर म्हणाले.

मंत्री मोन्सेरात यांचा घरी राहूनच आढावा

पणजीतील लोकांच्या समस्येवेळी उत्पल पर्रीकर कधीही धावून आलेले नाहीत. त्यांच्यात त्याचे वडील दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यासारखे कोणतेही गुण नाहीत, असे रोहित मोन्सेरात यांनी सांगितले. मंत्री बाबुश मोन्सेरात हे आज मतदान केंद्रावर फिरताना दिसले नाहीत. त्यांच्या मानेच्या त्रासामुळे हे घरी राहनच प्रत्येक केंद्रावरील मतदानाचा आढावा घेत होते.

चांगली टक्कर

मोन्सेरात यांच्या पॅनलमधील प्रभाग क्र. १३ चे उमेदवार व माजी महापौर उदय मडकईकर हे आवर्जुन केंद्रावर उपस्थित होते. अनेकदा ते या प्रभागातून निवडून आले आहेत त्यामुळे ते सहज विजयी होतील, अशी चर्चा मतदारांमध्ये होते. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेवर मंत्री मोन्सेरात यांचे वर्चस्व असले तरी यावेळी उत्पल पर्रीकर यांच्या आम्ही पणजीकर पॅनलमधील उमेदवार चांगली टक्कर देतील, अशी चर्चा मतदारांत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT