Panaji Municipal Corporation Reservation 
गोवा

Goa Municipal Election 2026 | पणजी मनपा निवडणूक 11 मार्चला

Goa Municipal Election 2026 | आचारसंहिता लागू; 14 पंचायत प्रभागांसाठी 8 मार्चला निवडणूक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी महापालिकेची निवडणूक ११ मार्चला घेण्यात येणार असून, त्याची मतमोजणी व निकाल १३ मार्च रोजी जाहीर केला जाईल, अशी घोषणा गोवा राज्य निवडणूक आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी केली. त्यामुळे आजपासून महापालिका क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या व्यतिरिक्त गोव्यातील विविध तालुक्यांमधील १४ पंचायतींच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर केला.

ही पोटनिवडणूक ८ मार्चला होऊन ९ मार्चला मतमोजणी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महापालिका निवडणुकीसाठी अधिक माहिती देताना आयुक्त डिसोझा म्हणाले की, ३० प्रभागांच्या निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण होत आली आहे. पणजी महापालिकेची मुदत २९ मार्च २०२६ रोजी संपत असल्याने कायद्यानुसार त्यापूर्वी नवीन महापालिका मंडळ स्थापन होणे गरजेचे आहे.

ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर नसेल. हे मतदान मतपत्रिकेद्वारे होणार आहे. तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी हे निर्वाचन अधिकारी असतील. यावेळी आयोगाचे सचिव वेनान्सिओ फुर्तादो व सहायक संचालक सागर गुरव उपस्थित होते. या निवडणुकीत ३० प्रभागांपैकी १० प्रभाग महिलांसाठी, ८ प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) तर १ प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

निवडणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असून, देखरेखीसाठी भरारी पथके तसेच निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार आहे.

सभा व कोपरा बैठकींवर व खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वसाधारण तसेच खर्च पाहणी निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी जुनी मतदार यादी (१ जानेवारी २०२५) गृहित धरण्यात येणार आहे.

एकूण मतदार - ३२ हजार ४९६ पुरुष मतदार १५ हजार २२५ महिला मतदार १७ हजार २७१ प्रभागातील सर्वाधिक मतदार -- प्रभाग ५१६७१ प्रभागातील कमी मतदार प्रभाग प्रभाग १६८२८ ३० प्रभागांसाठी एकूण मतदान केंद्रे - ४८ ८ मार्चला १४ पंचायत प्रभागांसाठी पोटनिवडणूक पणजी महापालिकाबरोबरच राज्यातील विविध तालुक्यांतील १४ रिक्त पंचायत प्रभागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही यावेळी आयुक्त डिसोझा यांनी जाहीर केला.

या प्रभागांसाठी ८ मार्चला २०२६ रोजी मतदान होईल तर ९ मार्चला मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी १८ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. ही पोटनिवडणूक पेडणेतील चांदेल हंसापूर (प्रभाग १) व मांद्रे (प्रभाग ४), डिचोलीतील पिळगाव (प्रभाग ७) व लाटंबार्से (प्रभाग ३), बार्देशमधील पिळर्ण मार्ना (प्रभाग १), सिरसई (प्रभाग ६), साल्वादोर द मुंद (प्रभाग २) व कांदोळी (प्रभाग १), सालसेतमधील आके बायश (प्रभाग ६), फोंड्यातील बोरी (प्रभाग १), वेलिंग प्रियोळ कुंकळ्ळी (प्रभाग ३), अडकोण (प्रभाग ३), केपेतील बाळ्ळी अडणे (प्रभाग ८), काणकोणधील लोलये पोळे (प्रभाग ८) मध्ये होणार आहे. संबंधित तालुक्यातील मामलेदार हे निर्वाचन अधिकारी असतील. खर्चाची मर्यादा ४० हजार रुपये आहे. मतदान मतपत्रिकेद्वारे होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम उमेदवारी

अर्जाची तारीख १७ ते २४ फेब्रुवारी २०२६ सकाळी १० ते दु. १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्जाची छाननी २५ फेब्रुवारी स. १० ते संपेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे २६ फेब्रुवारी स. १० ते दु. ३ वाजेपर्यंत निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची यादी २६ फेब्रुवारी मतदान तारीख व वेळ ११ मार्च स. ८ ते संध्या. ५ पर्यंत मतमोजणी व निकाल - १३ मार्च स. ८ वाजल्यापासून ते संपेपर्यंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT