पणजी : पुढारी वृत्तसेवा
'पल्मनरी एम्बोलिझम'चा झटका आलेल्या एका ३७ वर्षीय बँक कर्मचाऱ्यासाठी डॉक्टरच देवदूत ठरले. त्याला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले. डॉक्टरांच्या पथकाने 'कॅथेटर-डायरेक्टेड पल्मनरी थ्रोम्बेक्टोमी' या प्रक्रियेद्वारे या रुग्णाचा जीव वाचवला.
अधिक माहितीनुसार, या बँक कर्मचाऱ्याला श्वास घेण्यास तीव्र त्रास होऊ लागला. त्यात त्याचा रक्तदाब कमी होऊ लागला. त्यामुळे त्याला पणजीतील एका रुग्णालयात दाखल केले. येथील 'पल्मनरी मेडिसिन' तज्ज्ञ डॉ. हरदत्त करंडे यांना संबंधित रुग्णाच्या फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ अडकल्याची शंका आली.
या रुग्णाला 'कॅथेटर-डायरेक्टेड पल्मनरी थ्रोम्बेक्टोमी'ची गरज असल्याचे लक्षात घेऊन डॉ. करंडे यांनी दुसऱ्या इस्पितळात पाठवले.
तिथे १ जुलै रोजी दाखल झाल्यानंतर आपत्कालीन वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नीरजा यांनी त्याला त्वरित 'पल्मनरी एम्बोलिझम रिस्पॉन्स टीम' कार्यान्वित असलेल्या अतिदक्षता विभागात हलवले.
या टीममध्ये डॉ. जॉन मुचाहारी, डॉ. चारुदत्त जयंत संभाजी, डॉ. इलेन रॉड्रिज आणि डॉ. योगेश गौडे यांचा समावेश होता. या टीमने रुग्णाची जलद तपासणी केल्यानंतर तातडीने 'कॅथेटर-डायरेक्टेड पल्मनरी थ्रोम्बेक्टोमी' ही प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि संबंधित रुग्णाचा जीव वाचवला.
डॉ. चारुदत्त संभाजी यांनी सांगितले की, 'पल्मनरी एम्बोलिझमची स्थिती एखाद्या पंपासारखी असते. ज्यात हृदय म्हणजे पंप आणि रक्तवाहिन्या म्हणजे पाईप्स असतात. पंप काम करत असतो, पण पाईप बंद झालेला असतो. हृदय अधिक जोर लावून रक्त ढकलण्याचा प्रयत्न करते.
परंतु ऑक्सिजन घेण्यासाठी रक्त फुफ्फुसापर्यंत योग्यरीत्या पोहोचू शकत नाही. यामुळे हृदयावर प्रचंड ताण येतो. ही स्थिती अत्यंत कमी वेळात जीवघेणी ठरू शकते. एका विशेष उपकरणाचा वापर करून आम्ही रक्तप्रवाह रोखून धरणारी रक्ताची गाठ बाहेर काढली. ही प्रक्रिया कमी वेळात पूर्ण झाली; पण त्याचे परिणाम त्वरित दिसून आले.