Goa News
दाबोळी : वेर्णा येथील एका खोलीत रविवारी एक २१ वर्षीय युवक बेशुद्ध अवस्थेत आढळला; नंतर त्याला रुग्णालयात नेले असता तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मार्च रोजी दुपारी १२.२५ च्या सुमारास कासावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून माहिती मिळाली की, वेर्णा येथे राहणारा आणि मूळचा झारखंडचा रहिवासी असलेला भरत कोरवा याला बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आले आहे. चौकशीदरम्यान असे उघड झाले की भरत आणि त्याच्या मित्रांनी २८ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत दारू प्यायली होती.
पोलिसांनी सांगितले की, तो युवक नंतर रात्रीचे जेवण न करताच झोपला आणि सकाळी त्याच्या मित्रांना तो बेशुद्धास्थेत आढळला, त्याच्या नाकातून फेस येत होता. त्याला तत्काळ कासावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले, जिथे असलेल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी आणि पंचनामा केला. वैद्यकीय कायदेशीर सोपस्कारांसाठी मृतदेह मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात जतन करून ठेवण्यात आला आहे. वेर्णा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश भोमकर यांच्यामार्फत पुढील चौकशी सुरू आहे.