elephant file photo
गोवा

Onkar Elephant Attack | 'ओंकार' हत्तीचा धुमाकूळ सुरूच! तांबोसे अन् तोरसे परिसरात बागायतींचे मोठे नुकसान

Onkar Elephant Attack | लोकांकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
उगवे, तांबोसे, मोप आणि तोरसे परिसरात 'ओंकार' हत्तीने बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या हत्तीमुळे मानवी जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ पंचनामे करून तुटपुंजी नुकसानभरपाई देण्याऐवजी सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तांबोसे येथे मध्यरात्री ओंकार हत्तीने तुळशीदास शिरोडकर यांच्या बागायतीत प्रवेश करून मोठी नासधूस केली. त्यानंतर तो तोरसे येथील शेटेवाडा व हरिजनवाडा परिसरात पोहोचला. तिथे सुबोधिनी परब तसेच तुळशी-विनायक शेट्टी यांच्या बागायतीतील केळी व उत्पन्न देणाऱ्या कवाथांच्या झाडांचे नुकसान केले.

दहा वर्षे मेहनतीने वाढवलेली झाडे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सुबोधिनी परब यांनी सांगितले की, स्वतःच्या पैशातून कवाथांची रोपे आणून बागायत उभी केली होती. आता उत्पन्न मिळण्याच्या अवस्थेत असताना हत्तीने झाडे नष्ट केली. नुकसानभरपाईपेक्षा पुन्हा नुकसान होणार नाही, अशी कायमस्वरूपी व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली.

तोरसेच्या पंच छाया शेट्ये यांनीही ओंकारचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. हत्तीने वारंवार परिसरात येऊन कवाथे, केळी, पोफळी यांचे नुकसान केले असून एका वाहनाचेही नुकसान केल्याचे त्यांनी सांगितले.

नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याबरोबरच हत्तीच्या वावरावर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करावी, असे त्यांनी नमूद केले. पुरेसे मनुष्यबळ व आधुनिक साधनसामग्री नसल्याने त्यांच्यावरही मर्यादा येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एखाद्या शेतकऱ्याचा बळी गेल्यानंतर सरकार जागे होणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT