समुद्र किनाऱ्यावरील खडक 
गोवा

Betul Floating Jetty Collapse | बेतुल किनाऱ्यावरील ओएनजीसी जेटी कोसळली

Betul Floating Jetty Collapse | खवळलेल्या समुद्राचा तडाखा; प्रवेशावर तात्पुरते निर्बंध जारी

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

दक्षिण गोव्यातील बेतुल किनाऱ्यावर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) तर्फे उभारण्यात येत असलेल्या तरंगत्या जेटीला खवळलेल्या समुद्राचा जबरदस्त तडाखा बसून तिचा काही भाग कोसळला. समुद्रातील उंच लाटा आणि तीव्र प्रवाहामुळे जेटीच्या आधाररचनेचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले आहे.

या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि पर्यटकांनी घटनास्थळी गर्दी केली.

संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सुरक्षेच्या दृष्टीने जेटी परिसरात नागरिकांच्या प्रवेशावर तात्पुरती निर्बंध घालण्यात आले आहेत. सध्या गोव्यात मान्सूनचा जोर कायम असून समुद्र प्रचंड खवळलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टीवर उसळणाऱ्या उंच लाटांमुळे अनेक ठिकाणी धूप आणि नुकसानीच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत बेतुल येथील तरंगत्या जेटीवर सतत लाटांचा मारा होत होता.

अखेर समुद्राच्या प्रचंड तडाख्यामुळे जेटीच्या आधारासाठी उभारलेल्या संरचनांचे नुकसान होऊन तिचा काही भाग कोसळला. प्राथमिक माहितीनुसार, आधारस्तंभ आणि जोडरचनेचे नुकसान झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बेतुल येथील हा प्रकल्प सुरू झाल्यापासून स्थानिक ग्रामस्थ, पारंपरिक मच्छीमार आणि पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने आक्षेप नोंदविण्यात येत होते.

या प्रकल्पामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम होईल, किनारपट्टीच्या नैसर्गिक रचनेत बदल होईल आणि सागरी पर्यावरणाला धोका निर्माण होईल, अशी भीती त्यांनी वारंवार व्यक्त केली होती. यासंदर्भात विविध आंदोलने, निवेदने आणि हरकतीही सादर करण्यात आल्या होत्या. दुर्घटनेनंतर संबंधित तांत्रिक अधिकारी आणि अभियंते घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीसाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT