पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात एकटाच येऊन अनेकांचा लाडका बनलेला ओंकार हत्ती बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा कळपापासून दूर झाला आहे. ओंकारची पावले पुन्हा गोव्याच्या दिशेने वळली आहेत. तो कळप सोडून गोवा सीमेवरील सासोलीत पोचला आहे. उर्वरित पाच हत्तीही दोन कळपात विभागले आहेत.
बाहुबली व छोटी मादी मोर्लेतून मुळस हेवाळेत पोचले आहेत, तर मोठी मादी आणि २ पिल्ले घोटगेवाडीतून पुन्हा मोर्लेत पोचली आहेत. घोटगेवाडी येथे सहाही हत्तींचा कळप १७ रोजी सायंकाळी ७.३१ वाजता एकत्र होता. त्यानंतर ओंकार बाजूला झाला. बाहुबली आणि छोटी मादी एका कळपात, तर मोठी मादी आणि दोन पिल्ले दुसऱ्या कळपात विभागली आहेत.
ते दोन्ही कळप घोटगेवाडी येथून केर, मोर्लेकडे परतले, तर ओंकार त्याच रात्री घोटगे मायना येथे होता. तिथून तो परमेत गेला. तिथे ३ दिवस राहून तो गोवा सीमेवरील सासोलीत पोचला आहे. तिथे तो २ दिवस आहे. एकतर तो सीमा ओलांडून हणखणेत येईल किंवा मागे कळणेत जाऊन नेतर्डेमार्गे फकीरफाटा येथे येईल.
एकदा तो त्या परिसरात पोचला तर तो पुन्हा मागे आलेल्या गावांमध्ये येऊ शकतो. काहींच्या मते तो पुन्हा इन्सुलीकडेही जाऊ शकतो. तिसरी शक्यता अशी आहे की, तो पुन्हा तिलारी खोऱ्यात मागे जाऊ शकतो. आता त्याला दोडामार्ग, सावंतवाडी आणि उत्तर गोव्याच्या अनेक गावांतील वाटा माहिती झाल्या आहेत.
दरम्यान, उर्वरित ५ हत्ती दोन कळपात विभागले आहेत. काही दिवसांपूर्वी ५ हत्ती रात्री मोर्ले फॉरेस्टमध्ये एकत्र दिसले. त्यानंतर मोर्लेतील मोर्ये कुटुंबाच्या केळीच्या बागेत बाहुबली आणि छोटी मादी बराच काळ वावरत होती. चंद्रकांत बेर्डे कुटुंबीयांच्या बागायतीतही कळपाने नुकसान केले. सध्या बाहुबली आणि छोटी मादी सोनावल, मेढे धरण, मुळस असा प्रवास करीत हेवाळेत पोचले आहेत, तर मोठी मादी आणि दोन पिल्ले घोटगेवाडीतून मोर्ले फॉरेस्टमध्ये गेली आहेत. गेले काही दिवस यांचा वावर घोटगे, घोटगेवाडी, पाळ्ये, मोर्ले, सोनावल, या भागात होता. तत्पूर्वी त्यांनी शिरवल, तळकट, कोलझर या भागातही फेरफटका मारला होता. या कळपातील गणेश टस्कर सध्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे. त्याच्या जागी आता बाहुबली कळपात आला आहे.
ओंकारसह ५ हत्ती गोव्यात येण्याची होती भीती
मधल्या काळात बाहुबली या कळपापासून वेगळा झाला होता. त्या काळात कळपाचे नेतृत्व ओंकार करत होता. या काळात त्यांनी शिवल, तळकट, कोलझर या भागातही डेरा टाकला होता. ओंकार सीमेवरून अख्ख्या कळपासह गोव्यात येईल, अशी भीती होती; मात्र ओंकार सीमेवरून पुन्हा तिलारीकडे गेला.
बाहुबली आणि मादीचा बोंडूवर ताव...
सध्या काजूचा हंगाम जोरात आहे. काजू बागेत शेतकरी काजू काढून बोंडू ढीग मारून ठेवतात. सध्या बाहुबली आणि छोटी मादी त्यावर ताव मारीत आहेत. मोर्लेतील संतोष मोर्ये यांच्या बागेत त्याचे व्हिडीओही काढले आहेत. हत्ती हा जसा पट्टीचा पोहणारा आहे, तसाच तो दारूचा शौकीन पण आहे. त्याच्या भीतीने आसाममध्ये तर दारू जमिनीखाली पुरून ठेवली जाते.