पणजी : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्गातील दोडामार्गमधून रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी आलेला 'ओंकार' हत्ती २५ रोजी सीमा ओलांडून डोंगरपाल, फोंड्ये, कळणे, मोरगाव येथे गेला होता. आज, गुरुवारी दुपारी तो पडवे माजगाव-तळकट रस्त्यावर होता.
दरम्यान, ओंकारने मंगळवार, दि. २५ रोजी रात्री फोंड्ये येथे उभ्या करून ठेवलेल्या एका कारवर हल्ला केला. सुळ्यांमुळे कारचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर काहींनी ओंकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मात्र, अनेकांनी एकट्या ओंकारवर लक्ष ठेवण्यासाठी वनरक्षक प्रकाश रानगिरे, वनसेवक मनोहर गावडे, शुभम कळसूळकर, पुंडलिक राऊळ, संदेश हळदणकर यांची टीम रात्रीच्या गस्तीवर होती, मग ही टीम काय करीत होती?
पाच कर्मचारी ओंकारच्या बंदोबस्तासाठी तैनात असताना त्याने कारवर कसा हल्ला केला, असा प्रश्न विचारला. पश्चिम बंगालमधील प्रशिक्षित टीमने दोडामार्गमध्ये येऊन मशलचा वापर करून हत्तीला वस्तीपासून दूर ठेवण्याचे प्रशिक्षण दिले होते. असे असताना ओंकार कारकडे जाण्यापूर्वी त्याला वळवण्याचे प्रयत्न या स्थानिक वनकर्मचाऱ्यांच्या टीमने का केले नाहीत, असा स्थानिकांचा प्रश्न आहे.
फोंड्ये येथे ओंकारने कारवर हल्ला केला त्याची नुकसान भरपाई वन विभागाकडून मिळणार नाही, त्यासाठी पंचनाम्याच्या आधारे वाहनमालक विम्याची रक्कम मिळवू शकतो, अशी माहिती दोडामार्गचे वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांनी दिली.
ओंकार गोव्यात आला की, वनकर्मचारी आणि काही स्थानिक ग्रामस्थ त्याला हुसकावून महाराष्ट्रात पाठवण्याचा प्रयत्न करतात, यामुळे तो आक्रमक होत असावा. पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दौरा असल्याने गोवा वनविभागाने ओंकारला कित्येक किलोमीटर हुसकावत दोडामार्गच्या हद्दीत नेल्याने थकलेला आणि संतापलेला ओंकार अधिकच हिंसक बनल्याचे दोडामार्गमधील स्थानिकांचे म्हणणे आहे.
तांबोसे, उगवे आणि मोपा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून 'ओंकार' हत्तीने बागायतींमध्ये धुमाकूळ घालत मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या पेडणे येथील कार्यालयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली.
यावेळी गोवा आणि महाराष्ट्र सरकारने संयुक्त मोहीम राबवून 'ओंकार' हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा आणि त्याला सुरक्षितरीत्या त्याच्या मूळ अधिवासात स्थलांतरित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी धारगळचे सरपंच अर्जुन कानोलकर, वारखंडचे माजी सरपंच मंदार परब, तोरसेचे पंच सदस्य दया गवंडी तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते. दिलीप गवंडी, तुळशीदास शिरोडकर, सुलोचना गवंडी, श्रीकांत गवंडी, नितीन सावंत, रामा शेट्ये, सुबोधिनी परब, विनायक शेट्ये, दिनेश शेट्ये, प्रसाद सालकर, गोविंद महाले आणि आदिनाथ त्यांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना बाबू आजगावकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून ठोस कारवाई करावी. 'ओंकार' हत्ती वारंवार महाराष्ट्राच्या हद्दीतून गोव्यातील या भागात येत असल्याने गोवा आणि महाराष्ट्र सरकारने संयुक्तरीत्या विशेष मोहीम हाती घेण्याची आवश्यकता आहे. दोन्ही राज्यांच्या वन विभागांमध्ये समन्वय साधून हत्तीला सुरक्षितरीत्या योग्य अधिवासात स्थलांतरित करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आजगावकर यांनी केली.