Goa Omkar Elephant  (Pudhari File Photo)
गोवा

Omkar Elephant | पेडणेकरांची झोप उडाली! 'ओंकार' हत्तीचे मोप परिसरात पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

Omkar Elephant | शेतकरी धास्तावले : आर्थिक संकटासह जीवालाही धोका

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या निसर्गरम्य सीमावर्ती भागात गेल्या अनेक महिन्यांपासून वावरणारा ओंकार हत्ती पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. सुमारे साडेतीन महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर ओंकार सावंतवाडी-दोडामार्ग परिसरातून पायपीट करत पेडणे तालुक्यातील मोप परिसरात आला आहे.

कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या काजू आणि आंब्याचा हंगाम सध्या ऐन भरात असतानाच हत्तीचे दर्शन झाल्याने बागायतदार आणि सामान्य शेतकरी पूर्णपणे धास्तावले आहेत. त्यांच्यासमोर आता आर्थिक संकटासोबतच जीवाचा धोकाही निर्माण झाला असून, दोन्ही राज्यांचे वन विभाग हायअलर्टवर आले आहेत.

मोप हे गाव महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेले असल्याने हत्तीला या दोन्ही राज्यांमध्ये ये-जा करणे सोपे झाले आहे. सध्या सावंतवाडी आणि दोडामार्ग परिसरात एकूण सहा हत्तींचा वावर असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. यातील पाच हत्तींचा कळप दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात सक्रिय आहे, तर ओंकार मात्र एकटाच सीमाभागात फिरत असून त्याने मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मोठी दहशत निर्माण केली आहे.

रात्रीच्या वेळी बागायतींमध्ये शिरून काजूची झाडे उपटून टाकणे आणि उभ्या पिकांची नासाडी करणे यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीमोल होत आहेत. वन कर्मचारी हत्तीच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असले, तरी दाट झाडी आणि डोंगराळ भागामुळे त्याला रोखणे हे प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे.

ओंकारला पकडण्याची मोहीम लांबणीवर... महाराष्ट्र शासनाने ओंकारला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एका सामाजिक संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे हत्तीला पकडण्याची मोहीम लांबणीवर पडली आहे. या तांत्रिक आणि कायदेशीर गुंतागुंतीमुळे वन विभागाचे हात बांधले गेले आहेत.

पंचायतीतर्फे खबरदारीच्या सूचना

तांबोसे-मोप-उगवे ग्रामपंचायतीचे सरपंच सुबोध महाले यांनी रविवारी ग्रामस्थांसाठी तातडीची जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. नागरिकांनी रात्रीचा प्रवास टाळावा, घराबाहेर पडताना समूहाने राहावे आणि हत्ती दिसल्यास त्याला कोणत्याही प्रकारे चिथावणी देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुले आणि वृद्धांच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. हत्तीचा वावर आढळल्यास तत्काळ वनविभागाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले असून, गावपातळीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT