पणजी : खाद्य - पाण्यासाठी आणि त्रास देणार्यांपासून जीव वाचवण्यासाठी ओंकारची धडपड सुरू आहे. काहीजणांकडून ओंकारला त्रास दिला जात असल्याचा आरोप होत असून पेटत्या मशाली, दगड आणि अॅटम बॉम्ब व फटाक्यांचा वापर करून ओंकार हत्तीला पिटाळण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे हत्ती आक्रमक होण्याची भीती व्यक्त होत आहे.
वनविभागाने याकडे लक्ष देऊन ओंकारचे संरक्षण करण्याची गरज आहे. गोव्यात 14 दिवस आणि सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात 63 दिवस राहून पुन्हा ओंकार हत्ती गोव्यात परतला आहे. गेले 6 दिवस तो तोरसे, उगवे परिसरात आहे. या काळात तो आक्रमक झाला, गाड्यांची मोडतोड करतो असे आरोप काहीजणांकडून होताहेत.
पण, शेती बागायतीत, गावोगावी, रस्तोरस्ती व गल्ली बोळात आणि अंगणात फिरून आलेल्या ओंकारने 77 दिवसांत ना कुठल्या माणसाला धक्का दिला, ना कुठल्या गाडीवर हल्ला केला. या काळात त्याला स्थानिकांनी प्रेम दिले. अगदी त्याच्या जवळ जाऊन त्याच्या सोंडेलाही अनेकांनी हात लावला.त्याला ओंकार ये म्हटला की तो यायचा, जा म्हटले की जायचा. या सगळ्याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले आहेत.
इतका गुणी, संयमी संवेदनशील, प्रेमळ आणि माणसाळलेला ओंकार दुसर्या टप्प्यात गोव्यात आल्यावर आक्रमक झाल्याचे का सांगितले जाते. तो आक्रमक नाही,तर शांत आहे.पण,काहीजणांकडून वन अधिकारी व कर्मचार्यांच्या समोरच ओंकारवर दगड मारले जातात, अंगावर फटाके, ऍटम बाँब फेकले जातात.
मागच्या 14 दिवसांत गोव्यात कधी पेटत्या मशाली घेऊन त्याच्या अंगावर जात त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न झाला नव्हता, जो आता होतो आहे.तसे व्हिडिओही व्हायरल होत आहेत.पहिल्या 14 दिवसांत त्याला गोव्यात व त्यानंतर 63 दिवसांत सिंधुदुर्गात मिळालेली वागणूक चांगुलपणाची होती.
आता मात्र ओंकारला मिळणारी वागणूक त्याला बिथरवून टाकणारी, त्याच्या मनात राग उत्पन्न करणारी व त्याला मानसिक व शारीरिक त्रास देऊन आक्रमक होण्यास प्रवृत करणारी आहे.मानव आणि हत्ती यांच्यात होणारा हा संघर्ष वन विभागाने थांबवायला हवा. वन विभागाने हस्तक्षेप न केल्यास दुर्घटनाही घडू शकते, मग ओंकारला दोष देण्यात अर्थ नसणार, याची जाणीव वनविभागाने ठेवायला हवी.
उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने ओंकारला महाराष्ट्रातील नैसर्गिक अधिवासात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. योगायोग म्हणजे निकालाच्या नेमका आदल्या सायंकाळी ओंकार गोव्यात पोचला होता.त्याला पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यासाठी गोवा व महाराष्ट्र वनविभागाने संयुक्त प्रयत्न करायला हवेत.
गोवा व कर्नाटकाच्या वनमंत्र्यांनी संयुक्त बैठक घेऊन ओंकार पकड मोहीम मागच्यावेळी राबवण्याचे ठरवले होते. प्रशिक्षित माहूत आणि कुणकी हत्ती देण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. मात्र, ओंकार सिंधुदुर्गात गेल्याने ती बारगळली होती. आता पुन्हा ओंकार आल्याने आणि शेतकर्यांची त्याला गोव्यातून नेण्याची मागणी असल्याने हत्ती पकड मोहीम राबवावी आणि महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून व न्यायालयाच्या आदेशाचा अवमान न करता ओंकारला महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात सोडावे, अशी मागणी होत आहे.
सरकारने शेतकर्यांना योग्य भरपाई द्यावी
त्याला त्रास देणार्या माणसांपासून वाचण्यासाठी आणि भूक लागल्यावर खाण्यासाठी त्याची सध्या धडपड सुरू आहे. हत्ती किंवा अन्य वन्य प्राण्यांना राज्याच्या सीमा कळत नाहीत.त्यांना पाणी आणि खाद्यासाठी स्थलांतर करणे एवढेच माहीत असते. साहजिकच तो केळी, कवाथ्यांच्या सुईमधील गाभा आणि भातपिक खातो. हे सगळे भूक भागवण्यासाठी तो करत असला,तरी शेतकर्यांसाठी मात्र ते नुकसानच असते. शेतकर्यांचा उद्रेक रोखण्यासाठी सरकारने या नुकसानीची योग्य भरपाई द्यायला हवी.
त्रास न देण्याची सेव्ह ओंकारची मागणी
ओंकारला नैसर्गिक अधिवासात सोडावे आणि त्याला मारहाण करणार्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी लढा देणार्या सेव्ह ओंकार चळवळीचे बांदा दशक्रोशी आणि दोडामार्ग तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ओंकारचे गोवा वनविभागाने संरक्षण करावे,त्याला दिला जाणारा त्रास थांबवावा आणि त्याला नैसर्गिक अधिवासात नेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.