पणजी : पुढारी वृत्तसेवा
मतदार यादीत नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांसह नव्याने मतदानासाठी पात्र ठरलेल्या तरुणांची नोंदणी करण्यासाठी उत्तर गोवा जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. भारतीय निवडणूक आयोग (ईसीआय) आणि गोवा मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्या निर्देशानुसार ही मोहीम उत्तर गोव्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर गोवा जिल्हा निवडणूक अधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांची (ईआरओ) बैठक घेण्यात आली. या बैठकीत मतदार यादीत पात्र नागरिकांची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी विशेष मोहिमेचे नियोजन करण्यात आले.
या मोहिमेत तरुण आणि प्रथमच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र ठरलेल्या मतदारांवर विशेष भर देण्यात येणार आहे. नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्या माध्यमातून घरोघरी भेटी देण्यात येणार आहेत. मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाच्या प्रक्रियेचा हा एक भाग आहे.
पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याबरोबरच, मतदार यादीतील नोंदणी प्रक्रिया सुलभकरण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. एकही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये, तसेच प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा घटनात्मक अधिकार बजावता यावा, यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे..