पणजी : पुढारी वृत्तसेवा
उत्तर गोवा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने (डीआरएससी) बैठकीत बदल केलेल्या सायलेन्सरविरुद्ध (मॉडिफाईड सायलेन्सर) अधिक कठोर अंमलबजावणीवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. अतिशय मोठा आवाज निर्माण करणारे सायलेन्सर बसवलेल्या मोटरसायकलचा वाढता धोका जनतेकडून येणाऱ्या वाढत्या तक्रारींना कारणीभूत आहे.
अंमलबजावणी यंत्रणांनी राज्याच्या काही भागांमध्ये मोहिमांदरम्यान असे बदल केलेले सायलेन्सर जप्त करण्यास आधीच सुरुवात केली आहे. मात्र, अंमलबजावणी केवळ वाहन मालकांना दंड करण्यापुरती मर्यादित ठेवू नये. त्याऐवजी बेकायदेशीरपणे बदल केलेले सायलेन्सर बसवणारे गॅरेज आणि वर्कशॉपवरही कारवाई करावी, असा प्रस्ताव चर्चेतून पुढे आला.
समिती सदस्यांनी, अशा सायलेन्सरची जाहिरात करणाऱ्या किंवा ते बसवणाऱ्या आस्थापनांच्या व्यापारी परवान्यांची तपासणी करण्याची पुन्हा शिफारस केली. वारंवार होणाऱ्या उल्लंघनांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जर ते अशा कृत्यांना प्रोत्साहन देत राहिले. परवाने रद्द केले पाहिजेत, अशी मागणीही करण्यात आली.
रस्ते सुरक्षा समितीने महामार्गावरून मोकाट जनावरे हटवण्याच्या उपाययोजनांचाही आढावा घेतला. समितीने राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग, तसेच प्रमुख जिल्हा रस्त्यांवर देखरेख ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गस्ती वाहने तैनात करण्याच्या प्रस्तावाचाही फेरविचार केला. सरकारी जमिनी, जिथे वारंवार अतिक्रमण होते. त्यांचे संबंधितांनी नियमित निरीक्षण करण्याचा मुद्दाही चर्चेत घेण्यात आला.