Ganeshotsav DJ Culture Pudhari
गोवा

Vasco Ganeshotsav DJ | वास्कोत गणेशोत्सवात 'डीजे'वर पूर्णपणे बंदी; आमदार कृष्णा साळकर यांची पोलिस प्रशासनासोबत बैठक

Vasco Ganeshotsav DJ | आमदार साळकर यांच्या उपस्थितीत पोलिस प्रशासनासोबतच्या बैठकीत निर्णय

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
१४ सप्टेंबर रोजी राज्यात सुरू होणाऱ्या श्री गणेशचतुर्थीनिमित्त सरकारी पातळीवर विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. वास्कोतील सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार कृष्णा साळकर यांनी सरकारी पातळीवर बैठक घेऊन, गणेश मंडपात व गणेश विसर्जनावेळी 'डीजे' संगीत वाजवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचे सांगितले आहे. त्याऐवजी पारंपरिक पद्धतीचे दिंडी व सांस्कृतिक संगीताचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे.

सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सरकारी आदेशाचे पालन करण्याची विनंती आमदार साळकर यांनी केली आहे. वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ९) रोजी मुरगावचे उपजिल्हाधिकारी प्रतापिराव गावकर, मामलेदार प्रवीणजय पंडीत, मुरगावचे पोलिस अधीक्षक गुरुदास कदम, दाबोळी पोलिस स्थानकाचे निरीक्षक जॉन फर्नांडिस, अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप बिचोलकर, दृष्टी (जीवरक्षक), वाहतूक पोलिस व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करताना आमदार साळकर यांनी सांगितले की, प्रत्येक मंडळाने यंदाची गणेश चतुर्थी उत्साहाने साजरी करावी. तसेच प्रत्येक गणेश मंडळात सुरक्षेसाठी पोलिस व मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. प्रत्येकाने हिंदू संस्कृतीचे पालन करावे, असे आमदार साळकर यांनी सांगितले.

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले की, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपल्या मंडळात 'डीजे' संगीताचा उपयोग टाळावा. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत 'डीजे'चा उपयोग करू नये. सरकारी कायद्याअंतर्गत यंदा विसर्जन मिरवणुकीत 'डीजे'वर बंदी घातली आहे.

या नियमाचे सर्व गणेश मंडळांनी पालन करावे. तसेच वास्को खारीवाडा समुद्रकिनाऱ्यावर गणेश विसर्जनाच्या वेळी 'दृष्टी'चे जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. यावेळी समुद्रात बोट उपलब्ध असेल. याचा सर्व भक्तांनी उपयोग करावा, असे आवाहन आमदार कृष्णा साळकर यांनी केले.

सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त

श्री गणेश चतुर्थीस बहुतेक रहिवासी चतुर्थी साजरी करण्यासाठी आपल्या मुळगावी जातात. यावळी वास्कोतील सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक परिसरात पोलिसांमार्फत २४ तास गस्त घातली जाईल, असे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT