Nikita Shirodkar Goa Theatre Artist  
गोवा

Nikita Shirodkar Goa Theatre Artist | शिक्षकी पेशा अन् कथकची साधना! निकिता शिरोडकर यांनी जपला ग्रामीण रंगभूमीचा वारसा

Nikita Shirodkar Goa Theatre Artist | ग्रामीण रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजप्रबोधनाची प्रभावी चळवळ आहे.

पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजप्रबोधनाची प्रभावी चळवळ आहे. या रंगभूमीची ज्योत पुढच्या पिढीकडे सोपवण्यासाठी स्वतः कलाकार होण्याबरोबरच नवे कलाकार घडवावे लागतात. शिक्षणातून विद्यार्थ्यांना ज्ञान आणि संस्कार देत, अभिनय व नृत्याच्या माध्यमातून नव्या पिढीतील कलागुणांना आकार देण्याचे कार्य करणाऱ्या ग्रामीण भागातील धडपडणाऱ्या स्त्री कलाकारांमध्ये निकिता शिरोडकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते.

निकिता शिरोडकर यांनीही अभिनयाकडे केवळ प्रसिद्धी किंवा मनोरंजनाच्या नजरेतून पाहिले नाही. 'नाटकातून समाजप्रबोधन कसे करता येईल आणि ग्रामीण रंगभूमीची परंपरा कायमस्वरूपी कशी टिकवता येईल?' हा विचार त्यांच्या कलाप्रवासाच्या केंद्रस्थानी आहे.
२ जुलै २००० रोजी जन्मलेल्या निकिता शिरोडकर यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची विशेष आवड होती.

शालेय जीवनात नाट्यप्रयोगांमध्ये सहभागी होत त्यांनी अभिनयाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीच्या काळात 'उघडा ज्ञानेश्वर' या नाटिकात त्यांनी साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. बालवयात रंगमंचावर उभे राहून संवाद, हावभाव आणि प्रसंगानुरूप अभिनय करण्याचा मिळालेला अनुभव त्यांच्या पुढील कलाप्रवासासाठी महत्त्वाचा ठरला.

बाल भवन केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाला अधिक वाव मिळाला. 'गणपती जाते गावाला' या नाटिकेचे अनेक प्रयोग त्यांनी सादर केले. प्रत्येक प्रयोगातून रंगभूमीवरील आत्मविश्वास वाढत गेला. त्यानंतर 'तुमचं आमचं सेम नसतं' यासह विविध नाट्यप्रयोग आणि रंगयात्रा कार्यशाळांमधून त्यांनी आपल्या अभिनयकौशल्याला अधिक पैलू पाडले. या उपक्रमातून गोव्यातील विविध ठिकाणी ५० हून अधिक प्रयोग सादर करण्याची संधी त्यांना मिळाली.


'अवय तिरंगी', 'मम्मी फिरंगी', 'आम्ही बाईला बिंदास्त', 'बाजीराव पेशवा' अशा विविध नाटकांमध्ये भूमिका साकारत त्यांनी अभिनयक्षमता प्रेक्षकांसमोर आणली. सुरुवातीला रूपा नाईक यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने नृत्याचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर प्रेरणा पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कथक नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. आजही त्यांचे नृत्याचे शिक्षण आणि मार्गदर्शन सुरू आहे.

आज निकिता शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. एका बाजूला विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला स्वतःमधील कलाकार जिवंत ठेवण्याची धडपड, अशा दोन्ही भूमिका त्या समर्थपणे सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत.
कलाकाराच्या वाटचालीत कुटुंबाचे पाठबळ अत्यंत महत्त्वाचे असते.

वडिलांकडून त्यांना अभिनयाचा वारसा लाभला, तर घरातील इतर सदस्यांनीही त्यांच्या कलाप्रवासाला साथ दिली. त्यामुळे शिक्षण, नोकरी आणि कलासाधना यांचा समतोल राखणे त्यांना शक्य झाले. अनेकदा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा नोकरी मिळाल्यानंतर कलाकाराची कला व्यस्त जीवनात मागे पडते. मात्र, निकिता यांनी शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतरही रंगभूमी आणि नृत्याशी असलेले नाते तुटू दिले नाही; हीच त्यांच्या प्रवासाची विशेष बाब म्हणावी लागेल.

बालपणाच्या छोट्या नाटिकेपासून सुरू झालेली ही वाटचाल आज नाटक, कथक आणि शिक्षण अशा तीन वेगवेगळ्या क्षेत्रांना स्पर्श करत पुढे जात आहे. रंगभूमीने त्यांना आत्मविश्वास दिला, नृत्याने शिस्त आणि देहबोली दिली, तर शिक्षकी पेशाने नव्या पिढीशी जोडून ठेवले.
हातात ज्ञानाची शिदोरी, पायात कथकाचे घुंगरू आणि मनात रंगभूमीची ओढ घेऊन पुढे जाणाऱ्या निकिता शिरोडकर यांचा प्रवास हा ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.

त्यांच्यातील कलागुण ओळखून वडील दीपक शिरोडकर यांनी त्यांना बालवयामध्ये कलाशिक्षणासाठी पाठवले. मुलीच्या कलेला योग्य वयात योग्य व्यासपीठ मिळावे, या वडिलांच्या भूमिकेमुळे निकिता यांतील अभिनेत्री आणि नृत्यांगना हळूहळू आकार घेऊ लागली.
नृत्यगुरूच्या निरीक्षणक्षमतेविषयी बोलताना निकिता सांगतात की, समूहात अनेक शिष्य नृत्य करत असले आणि एखाद्या शिष्याचे एक पाऊल जरी चुकीचे पडले, तरी ते प्रेरणा पालेकर यांच्या सहज लक्षात येते.

चूक नेमकी कुठे झाली हे सांगून त्या ती दुरुस्त करून घेतात. अशा काटेकोर मार्गदर्शनामुळे नृत्यात अचूकता येते आणि कलाकाराला परिपूर्ण सादरीकरण करण्याची संधी मिळते.
शिक्षिका आणि कलाकार या दोन्ही भूमिका एकमेकांना पूरक ठरत आहेत. आपण जे शिकलो ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीदेखील कलाकाराची जबाबदारी असल्याची त्यांची भावना आहे.


कलाक्षेत्रात काम करताना प्रत्येक वेळी मानधनाची अपेक्षा असावीच असे नाही, असे निकिता मानतात. कला टिकली पाहिजे, तिचा दर्जा कायम राहिला पाहिजे आणि आपल्याकडे असलेले ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, याला त्या अधिक महत्त्व देतात.
कला म्हणजे केवळ छंद आणि त्यातून करिअर घडत नाही, हा समज आता बदलण्याची गरज असल्याचे निकिता सांगतात.

कथकाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यानंतर नृत्यशिक्षक म्हणून शाळा आणि विविध संस्थांमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. अभिनयातून नाटक, चित्रपट, मालिका आणि इतर माध्यमांतही करिअर करता येते. मात्र, त्यासाठी आत्मविश्वास, कलेविषयी खरी आवड, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य प्रशिक्षण या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्या मानतात.
कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यानंतर नृत्य, अभिनय किंवा इतर कलांसाठी वेळ कमी होतो. मात्र, निकिता यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. लग्नानंतरही अभिनय आणि नृत्याची साधना सुरूच ठेवायची.
वडील दीपक शिरोडकर यांनी बालवयाकडे नेलेले पहिले पाऊल, विजयकुमार नाईक यांच्याकडून मिळालेली अभिनयाची प्रेरणा, प्रेरणा पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली कथकाची शिस्तबद्ध साधना आणि पौर्णिमा केरकर यांच्याकडून मिळालेली वाचनाची गोडी या सगळ्यातून निकिता दीपक शिरोडकर यांच्यातील कलाकार घडत आहे.

दिवसा विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची शिदोरी देणारी शिक्षिका आणि रंगमंचावर पाऊल ठेवताच अभिनयात रमणारी अभिनेत्री; पायांत घुंगरू बांधल्यानंतर कथकाच्या तालात स्वतःला विसरणारी नृत्यांगना निकिता शिरोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या या विविध छटा आहेत.
त्यांच्यासाठी कला ही प्रसिद्धी किंवा केवळ मनोरंजनाचे साधन नाही; ती आयुष्यभर सुरू ठेवायची साधना आहे. म्हणूनच त्यांच्या मनातील निर्धारही स्पष्ट आहे. नोकरी असो, संसार असो किंवा आयुष्याच्या नव्या जबाबदाऱ्या; रंगभूमीशी असलेले नाते आणि घुंगरांचा नाद कधीही थांबू द्यायचा नाही.
चित्रपटात संधी मिळाली तर ती आनंदाने स्वीकारेन
भविष्यात एखाद्या चित्रपटात अभिनयाची किंवा विशेषतः कथक नृत्य सादर करण्याची संधी मिळाली, तर ती संधी आनंदाने स्वीकारण्याची त्यांची इच्छा आहे. पारंपरिक कथकाचे सौंदर्य मोठ्या पडद्यावर सादर करण्याची संधी मिळाली तर ती आपल्यासाठी आनंदाची बाब असेल, असे त्या सांगतात. पौर्णिमा केरकर यांच्याकडून आपल्याला वाचनाची प्रेरणा मिळाली आणि त्यांनीच आपल्यामध्ये वाचनाविषयी आत्मीयता निर्माण केल्याचे निकिता सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT