NH 66 Patradevi Dhargal  (छाया : नरेंद्र पाटील)
गोवा

NH 66 Patradevi Dhargal | पत्रादेवी ते धारगळ महामार्ग अपघातप्रवण

NH 66 Patradevi Dhargal |उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा 'मिशन फॉर लोकल' चा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तहेवा

राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील पत्रादेवी ते धारगळ महाखाजनपर्यंतचा रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. ठिकठिकाणी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांच्या कामात आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास पेडणेवासीयांसह रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारावा लागेल, असा इशारा 'मिशन फॉर लोकल'चे राजन कोरगावकर यांनी दिला.

राजन कोरगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोलवाळ येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. यावेळी सहायक अभियंता तारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या धारगळ, दोन खांब, वैभव पुरस्कडे आदी ठिकाणी उड्डाणपुलांचे काम सुरू आहे.

मात्र या ठिकाणी योग्य दिशादर्शक फलक, वाहतूक नियंत्रण व्यवस्था, वाहतूक पोलिस तसेच सुरक्षित वळणांची व्यवस्था नसल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत या मार्गावर अनेक अपघात झाले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. या मानवी बळींना जबाबदार कोण, असा सवाल कोरगावकर यांनी उपस्थित केला.

महामार्गावरील जंक्शन आणि ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी सर्कल पद्धतीने काम करून वाहतूक सुरळीत करावी, ट्रॅफिक सिग्नल बसवावेत तसेच वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी मागणी त्यांनी केली. वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी संबंधित विभागाने दररोज महामार्गाची पाहणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी राजन कोरगावकर यांनी एका माजी प्रधान अभियंत्याच्या कार्यकाळात महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला. अधिकारी हे २० ते २५ वर्षे सेवेत असतात. त्यामुळे त्यांनी केवळ राजकारण्यांच्या शब्दावर न चालता जनहित लक्षात घेऊन जबाबदारीने काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी राजू नरसे, सुनील नाईक, माजी सरपंच रुपेश परब, दिलीप हरमलकर, राजन पार्सेकर आदी उपस्थित होते.

उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन...

दोन खांब परिसरातील धोकादायक स्थितीबाबत खासदार सदानंद शेट तानावडे यांनी यापूर्वी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तरीही आजपर्यंत ठोस कार्यवाही का झाली नाही, असा सवालही कोरगावकर यांनी उपस्थित केला. या निवेदनावर योग्य अंमलबजावणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही सहायक अभियंता तारी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT