Goa Sports Science Workshop  
गोवा

Goa Sports Science Workshop | क्रीडा विज्ञानातील मास्टर ट्रेनर्सचे जाळे उभारणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa Sports Science Workshop | पेडे येथे क्रीडा विज्ञान क्षमता बांधणी कार्यशाळेचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील सर्व तालुक्यांमध्ये क्रीडा विज्ञानातील मास्टर ट्रेनर्सचे मजबूत जाळे विकसित करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. उच्च दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धतींचा अवलंब आवश्यक असून क्षमता विकास, दर्जादार पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक प्रगतीद्वारे क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पेडे येथील दयानंद बांदोडकर क्रीडा संकुलाच्या इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित 'विज्ञान आणि क्रीडा यांना जोडणारा दुवा' या विषयावरील तीन दिवसीय क्रीडा विज्ञान क्षमता बांधणी कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडामंत्री डॉ. रमेश तवडकर, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक डॉ. अजय गावडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, या कार्यशाळेतून असे प्रशिक्षित तज्ज्ञ तयार झाले पाहिजेत, जे तळागाळात वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धती, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा पोषण, दुखापत प्रतिबंध आणि कामगिरी व्यवस्थापन यांचा प्रभावी प्रसार करतील. कार्यशाळेदरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा लाभ प्रशिक्षक, खेळाडू आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचवून सहभागी क्रीडा विज्ञानाचे राजदूत बनावेत, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, आजच्या काळातील शारीरिक शिक्षण शिक्षकांची भूमिका केवळ शारीरिक प्रशिक्षणापुरती मर्यादित राहिलेली नाही. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य खेळात प्रशिक्षण देणे ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रत्येक शारीरिक शिक्षण शिक्षकाला विविध खेळांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी वैज्ञानिक प्रशिक्षण, प्रशिक्षकांचे सातत्यपूर्ण शिक्षण आणि आधुनिक क्रीडा विज्ञानाचा वापर अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रीडामंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी राज्यात मजबूत क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

पुराव्यावर आधारित प्रशिक्षण पद्धतींचा अवलंब करून या कार्यशाळेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी सहभागी प्रशिक्षकांना केले. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक डॉ. अजय गावडे यांनी मान्यवर व सहभागींचे स्वागत केले.

खेळ तरुणांना व्यसनापासून दूर ठेवू शकतात : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, शारीरिक शिक्षण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. तरुण खेळांमध्ये सक्रिय राहिल्यास ते अमली पदार्थांचे व्यसन आणि इतर अपायकारक सवयींपासून दूर राहतात. त्यामुळे त्यांचे लक्ष आरोग्य, तंदुरुस्ती आणि उज्ज्वल करिअरकडे केंद्रित होते. 'नशामुक्त युवा हा विकसित गोव्याचा पाया असून, सक्षम आणि निरोगी युवा विकसित गोवा व विकसित भारत घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल,' असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT