सासष्टी : कौटुंबिक भांडणे आणि मालमत्तेच्या घरगुती वादातून उद्भवलेल्या भांडणातून स्वतःच्या चुलत्याच्या पोटात सुरा खुपसून खून केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या दापट-लोलये, काणकोण येथील अजय खरात (वय २९) याला दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज, शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या व्यतिरिक्त पंचवीस हजार रुपये दंड आणि तो दंड भरल्यास मयताच्या पत्नीला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांनी हा निवाडा दिला.
चार वर्षांपूर्वी २० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हे खून प्रकरण घडले होते. आरोपी अजय खरात याचे वडील दारूच्या आहारी गेले असल्याने कुटुंबात वारंवार वाद होत असत. त्या दिवशी अजयचे चुलते जानू खरात (४४) हे त्याच्या वडिलांना घरी घेऊन जाण्यासाठी आले होते. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात अजयने आपल्या चुलत्याच्या पोटात सुऱ्याने वार केला. या गंभीर हल्ल्यात जानू खरात यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर काणकोण पोलिसांनी दोन तासांत त्याला अटक केली होती.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी केला होता. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील उत्कर्ष आवडे यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांनी १७साक्षीदारांची साक्ष आणि इतर पुरावे सादर करून आरोपीविरुद्धचा खुनाचा गुन्हा सिद्ध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने अजय खरात याला चार दिवसांपूर्वी खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते. मयताची पत्नी व मुलगा हे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार होते. त्यांची साक्ष या खटल्यात अत्यंत महत्त्वाची ठरली.
शवचिकित्सा अहवालात मृतदेहावर एकूण नऊ जखमा आढळल्या होत्या व त्या जखमा सुऱ्याच्या हल्ल्यामुळे होऊ शकतात, असे संकेत असल्याची साक्ष शवचिकित्सक डॉ. मधू घोडकिरेकर यांनी दिली होती. सरकारी वकील उत्कर्ष आवडे युक्तीवाद केला.