मडगाव : पुढारी वृत्तसेवा
विस्वासाच्या नात्यालाच तडा देत दिव्यांग व दृष्टीहीन ज्येष्ठाची तब्बल ७० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नावेली येथे उघडकीस आला आहे. केअरटेकरनेच आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने धनादेशांवर स्वाक्षऱ्या घेतल्या.
एटीएम कार्ड ताब्यात घेऊन खात्यातील लाखो रुपये काढल्याचा, तसेच पेन्शनच्या आधारे तीन लाखांचे कर्ज काढून त्याचाही अपहार केल्याचा आरोप आहे. मडगाव शहर पोलिस स्थानकात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मडगाव शहर पोलिस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, नावेली येथील मारिया इनेझ फर्नांडिस यांनी ही फसवणूक उघडकीस आणली. त्यांचे पती कायतानो फर्नांडिस हे शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असून, दृष्टीहीन आहेत. त्यांच्या देखभालीसाठी ठेवलेला सोहेल शेख हा केअरटेकर असल्याने त्याच्यावर कुटुंबाचा पूर्ण विश्वास होता. मात्र, त्यानेच आपला भाऊ रियान शेख आणि पॉलिनो यांच्यासोबत संगनमत करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.
पेन्शनच्या आधारे ३ लाख कर्ज
पोलिसात दिलेल्या तक्रारीत आणखी गंभीर आरोप करण्यात आला असून, संशयितांनी मारिया फर्नांडिस यांना नावेली येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत नेले. तिथे विविध कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करून घेत कायतानो फर्नांडिस यांच्या पेन्शनच्या आधारे तीन लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले.
हे कर्जही स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी वापरल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कालावधीत संशयितांनी कायतानो फर्नांडिस यांच्याकडून विविध बँकांच्या धनादेशांवर स्वाक्षऱ्या करून घेतल्या.
त्यानंतर त्यांचे एटीएम कार्ड आणि त्याचा गुप्त पिन क्रमांक ताब्यात घेत विविध व्यवहारांद्वारे त्यांच्या खात्यातून सुमारे ७० लाख रुपये काढल्याचा आरोप आहे.
ही बाब लक्षात आल्यानंतर मारिया फर्नांडिस यांनी मडगाव शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) व ६१ (२) (अ) अंतर्गत सोहेल शेख, रियान शेख आणि पॉलिनो या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक अनुष्का परब करीत आहेत.