MRF Workers Protest |  
गोवा

MRF Workers Protest | MRF कंपनीच्या 1600 कंत्राटी कामगारांचे धरणे आंदोलन; वेतनवाढ आणि बोनसची मागणी

MRF Workers Protest | दिवाळीचा बोनस अद्याप नाही, पगारही कमी! MRF कामगार आक्रमक, आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

उसगाव : पुढारी वृत्तसेवा

'वेतनात वाढ करा, बोनस द्या.' मागणीसाठी धाटवाडा उसगाव येथील एम.आर.एफ. आस्थापनेच्या १६०० ठेकेदार पद्धतीवरील कामगारांनी शनिवारी धरणे आंदोलन केले. ठेकेदार कामगारांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी कामगारांनी दिला आहे.

दिवाळीचा बोनस अद्याप ठेकेदार पद्धतीवरील कामगारांना मिळालेला नाही. आस्थापनेच्या उपहारगृहात दुय्यम दर्जाचे जेवण व खाद्यपदार्थ ठेकेदार पद्धतीवरील कामगारांना दिले जाते. जादा मागितले तर दिले जात नाही. होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कामगारांना कामावरून कमी केले जाते.

उपहारगृहातील सर्व सुविधा ठेकेदार पद्धतीवरील कामगारांना दिल्या जात नाहीत. नियमानुसार कामगारांचा पगार व बोनस वाढविण्यात आलेला नाही. ठेकेदार पद्धतीवरील कामगारांची सतावणूक केली जाते. अशा अनेक समस्या असल्याच्या कामगारांनी सांगितल्या. आस्थापनेने जर कुठल्याही एका कामगाराला बाहेर ठेवले, तर सर्व कामगार बाहेर राहतील, असा इशारा कामगारांनी यावेळी दिला आहे.

या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे वाळपई व उसगावचे नेते तसेच समाज कार्यकर्ते मिलिंद प्रभू यांनी ठेकेदार कामगारांना आपला पूर्ण पाठिंबा दिला आहे. या आस्थापनेचे कुंपण कायदेशीररित्या नाही. या संदर्भात पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. या आस्थापनेची मालवाहू अवजड वाहने राष्ट्रीय महामार्गाच्या आजूबाजूला पार्क केली जात असल्याने दुचाकीस्वारांना अपघात होण्याच्या संख्येत वाढ होत आहे.

आस्थापनेने जरी एका कामगारावर अन्याय केला तर, संपूर्ण वाळपई मतदार व उसगावचे लोक आस्थापनेच्या प्रवेश द्वारासमोर येऊन उभे राहतील. ठेकेदार कामगार हा माणूस नाही काय? या संदर्भात कामगार आयुक्तांना प्रश्न विचारण्यात येणार आहे, असे वाळपई-उसगावचे काँग्रेस नेते व समाज कार्यकर्ते मिलिंद प्रभू म्हणाले. विविध सबबी सांगून ठेकेदार कामगारांवर होणारा अन्याय, सतावणूक आस्थापनेच्या अधिकाऱ्यांनी बंद करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा मिलिंद प्रभू यांनी दिला.

वाळपई उसगावचे आरपीजीचे नेते रोहन नाईक यांनीही ह्या कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. उसगावात होतकरू युवा पिढी मोठ्या संख्येने असताना, आस्थापनेचे अधिकारी रोजगार संधीच्या जाहिराती शेजारच्या राज्यात देतात व परराज्यातील कामगारांचा आस्थापनेत भरणा केला जातो. प्रथम स्थानिक युवकांना रोजगार संधीच्या उपलब्ध करून द्यायला हव्यात. यासाठीही स्थानिकांच्या सहकार्याने आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती मिलिंद प्रभू यांनी ह्यावेळी बोलताना दिली. रोहन नाईक यांनीही ठेकेदार पद्धतीवरील कामगारांच्या समस्या व मागण्या यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितल्या.

या आहेत कामगारांच्या मागण्या

दिवाळीचा बोनस लवकर द्यावा, नियमानुसार वेतनात वाढ करण्यात यावी, प्रत्येक कामगाराला प्रती माह वेतन २५ हजार रुपये मिळायला हवे, तसेच बोनस म्हणून एका महिन्याच्या पगाराची रक्कम मिळायला हवी, उपहारगृहात दर्जेदार खाद्यपदार्थ व जेवण मिळायला हवे, कामगारांची सतावणूक होता कामा नये. कामगारांना सर्व सोयी सुविधा मिळायला हव्यात, अशा या ठेकेदार पद्धतीवरील कामगारांच्या मागण्या आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT