गोवा

Mormugao Port | मुरगाव बंदरावरून 74,766 पर्यटकांचे गोव्यात आगमन; 2024-25 मध्ये दाखल झाली 44 क्रूज जहाजे

Mormugao Port | २०२४-२५ मध्ये ४४ क्रूज जहाजे दाखल; देशांतर्गत पर्यटकांची संख्या ६२,५७०

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
२०२४-२५ या आर्थिक वर्षात मुरगाव बंदरावर ४४ क्रूज जहाजांमधून एकूण ७४,७६६ पर्यटक गोव्यात दाखल झाले. यामध्ये ३२ देशांतर्गत क्रूज जहाजांमधून आलेल्या ६२,५७०, तर १२ आंतरराष्ट्रीय क्रूज जहाजांमधून आलेल्या १२,१९६ प्रवाशांचा समावेश आहे.

गोव्यातील क्रूज पर्यटनाला चालना देण्यासाठी मुरगाव बंदर प्राधिकरणाने १२२.७२ कोटी रुपये खर्चाचा क्रूज टर्मिनल आणि फेरी सुविधांचा प्रकल्प हाती घेतला आहे. मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

सध्या क्रूज जहाजे हाताळल्या जाणाऱ्या ब्रेकवॉटर बर्षजवळ १३.४ एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. केंद्र सरकारने देशातील पाच प्रमुख बंदरांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टर्मिनलमध्ये २४ इमिग्रेशन काऊंटर्स, १० तपासणी काऊंटर्स, प्रवाशांसाठी प्रतीक्षा दालने आणि सामान हाताळणीची सुविधा असेल. याशिवाय ड्युटी-फ्री दुकाने, लाउंज आणि फूड कोर्टही उभारण्यात येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलमध्ये आधुनिक सुविधा

प्रकल्पात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूज टर्मिनल, फेरी व रो-पॅक्स सुविधा, पार्किंग, अंतर्गत रस्ते, व्यापारी जागा आणि सुशोभीकरणाचा समावेश आहे. प्रकल्पांतर्गत ३,२५६ चौरस मीटर क्षेत्रफळाची व्यापारी इमारत उभारण्यात येणार आहे.

त्यात क्रूज प्रवाशांसाठी विशेष खरेदी विभाग असेल. ही जागा सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली राहणार आहे. दोन्ही क्रूज टर्मिनल इमारतींचे एकूण क्षेत्रफळ ९,८७२ चौरस मीटर असेल. रो-पॅक्स आणि फेरी सेवांमुळे उत्तर गोव्यासह अन्य पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होण्याची अपेक्षा आहे.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम

देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन खात्याने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. त्यासोबतच राज्यात क्रूज पर्यटनाला चालना देणे, पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करणे आणि राज्यातील पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे,

या उद्देशाने मुर्गाव बंदरावर क्रूज टर्मिनल आणि फेरी सुविधांचा प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. पर्यटन मंत्रालयाने प्रत्येकी ५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. कोचीन बंदर प्राधिकरणाची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम सुरू असून, ३१ डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT