Mormugao Municipal Council Election  
गोवा

Mormugao Assembly Election | मुरगावात संकल्प आमोणकर विरुद्ध मिलिंद नाईक लढतीची चर्चा

Mormugao Assembly Election | काँग्रेस उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांची भाऊगर्दी : राजकीय समीकरणे बदलली

पुढारी वृत्तसेवा

वास्को : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघांपैकी एक असलेल्या मुरगाव विधानसभा मतदारसंघात २०२७ च्या निवडणुकीची चाहूल आतापासूनच लागली आहे. मुरगाव, वास्को, दाबोळी आणि कुठ्ठाळी या चार मतदारसंघांपैकी मुरगावमध्ये सर्वाधिक अटीतटीची लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. विद्यमान आमदार संकल्प आमोणकर आणि माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्यात पुन्हा एकदा थेट सामना रंगण्याची शक्यता असून, त्याचबरोबर काँग्रेसच्या उमेदवारीसाठीही अनेक इच्छुक पुढे येत असल्याने निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे.

२०२२ व्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर संकल्प आमोणकर यांनी माजी मंत्री मिलिद नाईक यांचा १,९४१ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी माजपमध्ये प्रवेश केल्याने मुरगावमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आता भाजपकडून संकल्प आमोणकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असली, तरी मिलिंद नाईक कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा सुरू असली तरी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. प्रदेश काँग्रेस समितीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष शरद चोपडेकर आणि अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष नमीर खान यांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

माजी नगराध्यक्ष असलेले शरद चोपडेकर गेल्या वर्षभरापासून विविध आरोग्य शिबिरे, सामाजिक कार्यक्रम आणि जनसंपर्क मोहिमेद्वारे मतदारांशी संपर्क वाढवत आहेत. अलीकडेच त्यांनी संपर्क कार्यालय सुरू केले असून, काँग्रेससाठी दीर्घकाळ प्रामाणिकपणे काम केल्यामुळे पक्षाने आपल्या उमेदवारीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाकडून माजी नगरसेवक नीलेश नावेलकर यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी मागील विधानसभा निवडणूकही लढवली होती.

मतदारसंघातील विविध स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवत त्यांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (शिंदे गट) देखील मुरगावमध्ये संघटन वाढविण्याचा प्रयत्न करत असून काही संभाव्य उमेदवारांशी संपर्क साधत असल्याची माहिती मिळत आहे. १९९९ मध्ये शेख हसन हरून यांनी पुन्हा काँग्रेसकडून विजय मिळवला. २००२ मध्ये काँग्रेसचे कार्ल वाइन विजयी झाले. २००७ मध्ये भाजपचे मिलिंद नाईक यांनी कार्ल वाझ यांचा पराभव करून प्रथमच विधानसभा गाठली. त्यानंतर २०१२ आणि २०१७मध्येही त्यांनी विजयाची परंपरा कायम राखली.

मात्र २०२२ मध्ये संकल्प आमोणकर यांनी अखेर त्यांचा पराभव करून दोन निवडणुकांतील पराभवाचा वचपा काढला संकल्प आमोणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदारसंघातील विविध विकासकामांना गती मिळाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

रस्त्यांचे हॉटमिक्सीकरण, भूमिगत गटार योजना, सडा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलाशय उभारणी, क्रीडांगणांचा विकास, सडा-बोगदा परिसरात २० खाटांचे रुग्णालय, डायलिसिस केंद्र, बायणा गृहनिर्माण मंडळाच्या इमारतींचा पुनर्विकास तसेच गोवा पुनर्वसन मंडळाच्या सदनिकांचे मालकीहक्क लाभार्थीच्या नावावर करण्याची प्रक्रिया यांसारख्या प्रकल्पांचा त्यांना राजकीय लाभ मिळू शकतो, असे मानले जात आहे.

दुसरीकडे, माजी मंत्री मिलिंद नाईक यांनीही समर्थकांच्या बैठका, घरभेटी आणि जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे. मंत्रिपदाच्या काळात केलेली विकासकामे, रोजगारनिर्मिती आणि विविध योजनांचा लेखाजोखा ते मतदारांसमोर मांडत आहेत. पालिका निवडणुकीत त्यांच्या समर्थकांचे सात नगरसेवक विजयी झाले होते. हे नगरसेवक अद्याप त्यांच्या सोबत असल्याचे मानले जाते.

प्रमुख पक्षांचे उमेदवार अद्याप अधिकृतपणे जाहीर झाले नसले तरी मुरगाव मतदारसंघात निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. संकल्प आमोणकर आणि मिलिंद नाईक यांच्यात पुन्हा थेट लढत होणार का, काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, तसेच गोवा फॉरवर्ड आणि इतर पक्ष कोणते पर्याय उभे करणार, याकडे आता राजकीय वर्तुळासह मतदारांचे लक्ष लागले आहे.

कोळसा प्रदूषणाचा मुद्दा

कायम मुरगाव मतदारसंघातील कोळसा प्रदूषणाचा प्रश्न आजही कायम असून तो प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरतो. विविध पक्षांनी हा प्रश्न सोडविण्याची आश्वासने दिली असली तरी अद्याप कायमस्वरूपी तोलगा निघालेला नाही. त्यामुळे विकासकामांसोबत पर्यावरणाचा मुद्दाही निवडणुकीत प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.

राजकीय इतिहास समृद्ध

मुरगाव मतदारसंघाचा राजकीय इतिहासही तितकाच रंजक आहे. १९६७ मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे गजानन पाटील हे पहिले आमदार झाले. १९७२ मध्ये मगोचे वसंत जोशी विजयी झाले. १९७७ पासून काँग्रेसचे शेख हसन हरून यांनी सलग चार वेळा विजय मिळवत मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केले. १९९४ मध्ये अपक्ष उमेदवार जॉन मॅन्युअल वाझ यांनी शेख हसन हरून यांचा पराभव करून मोठी राजकीय उलथापालथ घडवली. त्यावेळी बायण्णा वेश्यावस्ती हटाव आंदोलन हा प्रमुख निवडणूक मुद्दा ठरला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT