पेडणे : पुढारी वृत्तसेवा
उर्मल बागवाडा, मोरजी येथे शेटगावकर बंधूंच्या घराला गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत घरातील मूल्यवान वस्तू, सुवर्णालंकार, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच संसरोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत ५० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे घराच्या छपराला आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करून घराच्या इतर भागांना कवेत घेतले. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशामक दलाचा बंब येण्याची वाट न पाहता स्थानिकांनी पंप सुरू करून उपलब्ध पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांच्या या तत्परतेमुळे आग आणखी पसरण्यापासून काही प्रमाणात रोखण्यात यश आले.त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले.
आगीमध्ये घरातील किचन रूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. किचनमधील साहित्य, फ्रीज तसेच अन्य संसरोपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या. कपडे आणि घरातील इतर मूल्यवान साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
विशेष म्हणजे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांनी घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी केल्या होत्या. या वस्तूही आगीत जळून गेल्याने कुटुंबीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, घरातील कपाटात ठेवलेले किमती सुवर्णालंकार आणि रोख रक्कमही आगीत जळाली.