दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) घेऊन जाणारा टँकर चिखली येथील सेंट जॅसिंतो बेटाजवळ उलटल्याने बुधवारी खळबळ उडाली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, टँकरमधून इंधनगळती झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळाची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इंधनगळती झाली आहे का आणि त्याचा परिसर तसेच पर्यावरणावर काही परिणाम झाला आहे का, याची पाहणी सुरू करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारीही घेण्यात आली.
अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. टँकर सुरक्षितपणे हटविण्यासाठी यंत्रणांकडून प्रयत्न सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कशामुळे सुटले आणि इंधनगळतीचे प्रमाण किती आहे, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.