पणजी : पुढारी वृत्तसेवा
बोंडवेल तलावाच्या जागेची स्थिती गोवा राज्य पाणथळ प्राधिकरणाने स्पष्ट केल्याशिवाय या तलावाच्या २०० मी. परिघात कोणत्याही बांधकामांना परवाने देऊ नये, असे निर्देश दिले. बंदी घालण्याचा प्रस्ताव नगर नियोजन मंडळासमोर ठेवून त्याच्या मंजुरीनंतर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी सांताक्रुझ ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले.
गेल्या काही दिवसांपासून सांताक्रुझ ग्रामस्थ बॉडवेल तलावाच्या २०० मी. परिघात दिलेल्या बांधकामांना विरोध करत आहेत. या बांधकामाला नगर व शहर नियोजन खात्याने (टीसीपी) स्थगिती दिली असताना तेथे बोअरवेल खोदकामास सांताक्रुझ पंचायतीने परवानगी दिल्याने ग्रामस्थ संतप्त बनले आहेत.
उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार टीसीपीने या तलावाच्या परिघात २०० मी. सीमा निश्चित करून या क्षेत्रात दिलेले परवाने रद्द करण्याची मागणी करण्यासाठी सांताक्रुझ ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मंत्री विश्वजित राणे यांची त्यांच्या मिरामार येथील कार्यालयात भेट घेतली.
या शिष्टमंडळामध्ये आर्थर डिसोझा, विनासिओ डॉमनिक परेरा व इतर उपस्थित होते. मंत्री राणे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना आर्थर डिसोझा म्हणाले, मंत्री राणे यांनी आमचे म्हणणे ऐकून मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. टीसीपी मंडळाची बैठक १८ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामध्ये हा प्रस्ताव मंजूर केला जाईल असे सांगितले. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
पाच महिन्यांपासून गोवा राज्य पाणथळ प्राधिकरणाकडे बोंडवेल तलावाच्या परीघात सौमा निश्चित करण्याची मागणी होत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मंत्री राणे यांना भेटून जोपर्यंत या तलावाच्या सभोवतालच्या सीमा निश्चित होत नाहीत तोपर्यंत कोणत्याच बांधकामांना परवाने टीसीपीने देऊ नयेत, अशी विनंती करण्यात आली.
मोठा व्यवहार झाला असल्याचा आरोप
बोंडवेल तलावापासून ५० मी. क्षेत्राबाहेर बांधकामाला परवाना दिला गेला आहे. या बांधकामाला स्थगिती असताना सांताक्रुझ पंचायत मंडळाची ११ फेब्रुवारीला बैठक होऊन १२ फेब्रुवारीला तेथे बोअरवेल खोदकाम करण्यास परवाना देण्यात आला आहे.
टीसीपी परवानगी न घेताच पंचायत सचिवाने हा परवाना दिला आहे. हा तलाव सरपंचाच्या प्रभागात येत असल्याने हा परवाना देण्यासाठी मोठा व्यवहार झाला असल्याचा आरोप पंचसदस्य विनासिओ डॉमनिक परेरा यांनी केला.