Goa News Ramesh Tawadkar  Pudhari photo
गोवा

Minister Ramesh Tawadkar | मंत्री रमेश तवडकरांच्या कामाला तोड नाही; गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे विधान

Minister Ramesh Tawadkar | दामू नाईक : विकसित भारत संकल्प पदयात्रेत पाच हजार नागरिकांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

चावडी : पुढारी वृत्तसेवा
ज्या व्यक्तीने गरिबी पाहिली आहे, त्या व्यक्तीला जनतेचे दुःख समजते. त्यामुळे तोच व्यक्ती जनतेसाठी प्रभावीपणे कार्य करू शकतो. श्रमधाम असो, लोकोत्सव असो किंवा भाजी महोत्सव असो, जनताभिमुख कामे करण्याची रमेश तवडकर यांची परंपरा असून, रमेश तवडकर यांच्या कामाला तोड नाही, असे गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रसेवेची २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काणकोण भाजप मंडळातर्फे आयोजित विकसित भारत संकल्प पदयात्रेचा बावटा दाखवून प्रारंभ केल्यानंतर दामू नाईक बोलत होते. ही पदयात्रा गायतोंडे मैदान ते काणकोण कदंब बसस्थानकापर्यंत काढण्यात आली. या पदयात्रेत सुमारे ५ हजार नागरिक सहभागी झाले होते.

पदयात्रेनंतर काणकोण बसस्थानकाजवळ झालेल्या जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, जिल्हा पंचायत सदस्य अजय लोलयेकर, अंजली वेळीप, माजी नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, सायमन रेबेलो, सरपंच सविता तवडकर, धाकू मडकईकर, मोहन गावकर, विशाल देसाई, सिद्धेश गावकर, महेश नाईक, सूरज नाईक गावकर, विनय तुबकी, माजी नगरसेवक नारसिस्को फर्नांडिस, गंधेश मडगावकर, दिवाकर पागी, शाबा नाईक गावकर, कुशवंत भगत, नीता च्यारी, सुनील पैंगणकर, अमिता पागी, मंडळ अध्यक्ष प्रभाकर गावकर, कुशावती अध्यक्ष प्रभाकर गावकर व इतर उपस्थित होते.

नाईक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून केलेले काम जनताभिमुख आहे. त्यांच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महिनाभर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ३० जागा मिळतील आणि त्याची पहिली सुरुवात काणकोण मतदारसंघातून होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विकसित भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. त्याचप्रमाणे विकसित काणकोणचे स्वप्न काणकोणचे आमदार तथा मंत्री रमेश तवडकर यांनी पाहिले आहे. आजची गर्दी पाहता ही रमेश तवडकर यांच्या कामाची पावती असल्याचे बाबू कवळेकर यांनी सांगितले.

निवडणूक न लढणाऱ्यांनी हिणवू नये : मंत्री तवडकर

ज्यांनी एकही निवडणूक लढविलेली नाही, त्यांनी आपल्याला ३३ टक्क्यांचा आमदार म्हणून हिणवू नये. पुढील निवडणुकीत काणकोणचे मतदार ५१ टक्क्यांहून अधिक मते देऊन आपल्याला विजयी करतील, असा विश्वास रमेश तवडकर यांनी व्यक्त केला. यावेळी सविता तवडकर यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन प्रतिश प्रभूदेसाई यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT