पणजी : पुढारी वृत्तसेवा
फोंडा येथील गीतेश नाईक यांच्याविरुद्ध मेरशी येथील दिवाणी न्यायालयाने ५ लाख रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. नाईक हे दोन वर्षांपासून न्यायालयात हजर राहत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
३० मार्च रोजी दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद केले की, संशयित व त्यांचे वकील दोघेही अनुपस्थित आहेत. त्यामुळे न्यायालयाने नाईक यांच्याविरुद्ध हे वॉरंट जारी करण्याचे निर्देश दिले.
नाईक यांच्या वकिलांनी अनुपस्थितीमधून सूट देण्याचा अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने तो फेटाळला. न्यायालयाने नमूद केले की, ८ एप्रिल २०२४ पासून संशयित हजर राहत नाहीत आणि प्रकरण तीन वर्षांपासून प्रलंबित आहे.
कोणतेही ठोस कारण न दिल्याने अर्ज नाकारण्यात आला. पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे. हे प्रकरण शामसुंदर मिरजकर यांनी दाखल केले असून, २०२१ मध्ये दिलेला ५ लाख रुपयांचा चेक वटला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मिरजकर यांनी न्यायालयाला सांगितले की, नाईक नियमित हजर राहत नसल्यामुळे यापूर्वी १८ मार्च २०२४ रोजी जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करून त्यांना सर्व तारखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही नाईक अनेक सुनावण्यांना गैरहजर राहिले.