पणजी : पुढारी वृत्तसेवा
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया कोटा आणि राज्य कोट्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राज्य कोट्याची पहिली प्रवेश फेरी १३ ते २२ ऑगस्टदरम्यान पार पडणार असून, २८ ऑगस्ट ही प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत असेल.
देशभरातील एमबीबीएस, बीडीएससह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय समुपदेशन समिती (एमसीसी) आणि राज्य प्रवेश प्राधिकरणांनी चार टप्प्यांत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑल इंडिया कोटा व डीम्ड विद्यापीठांसाठी पहिली समुपदेशन फेरी ४ ते १७ ऑगस्टदरम्यान होणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे.
राज्य कोट्याची दुसरी प्रवेश फेरी ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान होणार असून, १४ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागेल. ऑल इंडिया कोट्याची दुसरी फेरी २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान होऊन ८ सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
तिसऱ्या फेरीत ऑल इंडिया कोट्यासाठी १० ते १८ सप्टेंबरदरम्यान समुपदेशन होईल. या फेरीतील प्रवेश २६ सप्टेंबरपर्यंत निश्चित केले जातील. राज्य कोट्याची तिसरी फेरी १६ ते २६ सप्टेंबरदरम्यान पार पडणार असून, १ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
उर्वरित जागांसाठी 'स्ट्रे व्हॅलन्सी' फेरीही आयोजित करण्यात आली आहे. ऑल इंडिया कोट्याची ही फेरी २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान, तर राज्य कोट्याची फेरी ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान होणार असून, दोन्ही कोट्यांतील प्रवेशाची अंतिम मुदत १० ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, वैद्यकीय अभ्यासक्रमांचे नवीन शैक्षणिक वर्ष ८ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रिया वेळेत आणि सुरळीत पूर्ण करण्यासाठी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना शनिवार, रविवार तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही प्रवेशाचे कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.