गोवा

Goa Fire Accident | वास्कोच्या मॉडर्न मार्केटमध्ये भीषण आग; डोळ्यांदेखत अनेक दुकानदारांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त

Goa Fire Accident | डोळ्यांदेखत जळून खाक झाला माल; दुकानदारांच्या डोळ्यांत अश्रू

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : शेखर कळंगुटकर
वास्को येथील पालिकेच्या मॉडर्न मार्केटमध्ये बुधवारी रात्री लागलेल्या आगीत अनेक दुकानदारांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. दिवाळीच्या सणासाठी मोठ्या आशेने विक्रीसाठी आणलेला माल डोळ्यांदेखत जळून खाक झाल्याने अनेक दुकानदारांना अश्रू अनावर झाले. वर्षभयाच्या मेहनतीनंतर सणासुदीच्या काळात चांगली कमाई होईल, या अपेक्षेने केलेली तयारी आगीने एका झटक्यात राख केली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक दुकानदारांनी मुंबई, गुजरात आणि इतर ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी सामान आणले होते. सणाच्या दिवसांत ग्राहकांची गर्दी वाढेल, व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळेल आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी हातभार लागेल, अशी त्यांना आशा होती. मात्र, आगीने त्यांच्या या अपेक्षेवर पाणी फेरले.

आगीची तीव्रता वाढत असताना काही दुकानदार आपला माल वाचवण्यासाठी मॉडर्न मार्केटच्या पहिल्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तेथील धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना रोखले. डोळ्यांसमोर आपली दुकाने जळत असताना काहीच करता येत नसल्याची असहायता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

आपले नुकसान किती झाले, दुकान पुन्हा कसे सुरू करावे आणि पुढील दिवस कसे काढायचे, असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले. दिवाळीसाठी घेतलेला माल, त्यासाठी केलेली आर्थिक गुंतवणूक आणि व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याच्या आशा आगीत भस्मसात झाल्या. दुकानदारांसाठी हे नुकसान केवळ मालाचे नव्हते, तर त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक आधारालाच बसलेला मोठा धक्का होता. सणाच्या दिवसांत आनंदाऐवजी त्यांच्या वाट्याला चिंता आली.

अन् आनंद हरपला...

या आगीतून सावरण्यासाठी दुकानदारांना पुन्हा उभे राहावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी आर्थिक मदत आणि व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची संधी मिळणे महत्त्वाचे आहे. मॉडर्न मार्केटमधील या आगीने अनेक कुटुंबांचा दिवाळीचा आनंद हिरावून घेतला असून, आता नुकसानग्रस्त दुकानदारांना सरकारी मदतीची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT