Sanguem Goa Shops Fire 
गोवा

Sanguem Goa Shops Fire| रिवणमध्ये अग्नितांडव; तब्बल सहा दुकाने खाक लाखो रुपयांचे नुकसान : शॉर्ट सर्किटमुळे आग

Sanguem Goa Shops Fire| रिवण बाजारात सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने भस्मसात झाली.

पुढारी वृत्तसेवा

सांगे : पुढारी वृत्तसेवा

रिवण बाजारात सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने भस्मसात झाली. या आगीत किराणा दुकाने, हॉटेले, दारूचे दुकान तसेच विमा कंपनीच्या कार्यालयासह लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. कुडचडे अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

प्राथमिक माहितीनुसार, एका किराणा दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण करत शेजारील आणखी एक किराणा दुकान, दोन हॉटेले, एक दारूचे दुकान आणि एका विमा कंपनीच्या कार्यालयाला वेढा घातला.

आग लागली तेव्हा दुकान बंद होते. दुकानातून धूर येत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी दरवाजा फोडून आत प्रवेश केला. मात्र, तोपर्यंत आगीने मोठा भडका घेतला होता.

पंच सदस्य उमेश वेळीप यांनी तातडीने अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर कुडचडे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.

यापूर्वी याच ठिकाणी किराणा सोसायटीला आग लागली होती. आता ही दुसरी घटना घडली आहे. यामुळे दुकानदार आणि स्थानिक ग्राहक दोघांनाही त्रास होणार आहे. बाधितांना आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू राहतील, असे सरपंच वैशाली नाईक यांनी सांगितले.

या बाजारात हॉटेल्स, किराणा दुकाने आणि इन्शुरन्स ऑफिस असल्यामुळे लोकांना चांगली सुविधा मिळत होती. आगीमुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कठीण काळात आम्ही दुकानदारांच्या पाठीशी असू, असे माजी जि. पं. सदस्य सुरेश केपेकर यांनी सांगितले.

रिवण बाजार पूर्ववतसाठी प्रयत्न

मंत्री सुभाष फळदेसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त दुकानदारांना शासनाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल असे सांगितले. रिवण बाजार पूर्ववत उभा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी सरपंच वैशाली नाईक, माजी जि. पं. सदस्य सुरेश केपेकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT