मडगाव : पुढारी वृत्तसेवा
मडगाव येथील पंचभाटकारगील परिसरात शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत एका घरातील सर्व मालमत्ता जळून खाक झाली. या भीषण आगीत घरातील पाळीव कुत्र्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
या आगीत अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज मडगाव अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी गील सोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २.४५ च्या सुमारास ही आग लागली. सत्यवान नाईक यांच्या मालकीचे हे घर आहे. आग लागली त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते.
शेजाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ नाईक यांना याची माहिती दिली. मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरित दाखल होत दोन बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य, सुवर्णालंकार तसेच रोकड जळून खाक झाली.
शेजाऱ्यांचे घर वाचले
परिसरात इतर घरे जवळच असतानाही सुदैवाने त्यांना आगीची झळ बसली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याप्रकरणी पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकारी सोझा यांनी दिली.