Goa Margao municipal file photo
गोवा

Margao Municipal Council | मडगाव पालिका बैठकीत गदारोळ

Margao Municipal Council | माजी आमदार दामू की आमदार सरदेसाई? श्रेष्ठ कोण, यावरून वाढला वाद

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

मडगाव पालिका मंडळाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील अखेरची बैठक विकासकामांपेक्षा गदारोळामुळेच अधिक चर्चेत राहिली. आमदार विजय सरदेसाई आणि माजी आमदार दामू नाईक यांच्यापैकी श्रेष्ठ कोण या विषयावर सुरू झालेली चर्चा क्षणात वादात बदलली.

गोवा फॉरवर्ड गटाच्या एका नगरसेवकाने आपल्या समोर विरोधी गटातील महिला नगरसेवक आहे, याचे भान न राखता त्यांना उद्देशून वाईट शब्द उच्चारले. एकीकडे नगराध्यक्ष दामू नाईक डेकोरम सांभाळा अशी विनवणी करत होते, तर दुसरीकडे नगरसेवक अ दर्जा प्राप्त असलेल्या या मडगाव पालिकेची लक्तरे वेशीवर टांगण्यात व्यस्त होते.

या कार्यकाळातील ही शेवटची बैठक असल्यामुळे मडगावच्या विकासाबद्दल या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होईल, असे मडगावकरांना वाटले होते. विकासाची चर्चा काही झाली नाही पण मावळत्या नगरसेवकांनी आपल्या असंभ्य वागणुकीमुळे सभागृहाचे पावित्र्य मात्र भंग केले. अखेरच्या बैठकीत शहरातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती.

सुरुवातीपासूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले. अनेक महिला नगरसेवक उपस्थित असतानाही काही नगरसेवकांनी असभ्य भाषा वापरल्याने वातावरण अधिकच तापले. मडगावकरांना विकासाच्या मुद्द्यांवर गंभीर चर्चा अपेक्षित असताना अखेरची बैठक मात्र गोंधळ आणि शाब्दिक संघर्षामुळेच गाजली. बैठकीदरम्यान महिला नगरसेविकांनाही शिवीगाळ आणि अवमानास्पद वक्तव्यांना सामोरे जावे लागले. दरम्यान मुख्याधिकारी मधू नार्वेकर यांनी मध्यस्थी केली नसता हा वाद विकोपाला गेला असता.

कचरा संकलनाच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी

दरम्यान, या गोंधळाच्या वातावरणात काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. मडगाव शहरासाठी नवीन कचरा संकलन एजन्सीच्या निविदा प्रक्रियेला अंतिम मंजुरी देण्यात आली. विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ २६ मे रोजी संपणार असून, त्यानंतर पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली जाईल. पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटची बैठक, गदारोळ आणि राजकीय वादामुळेच लक्षात राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT