मडगाव : पुढारी वृत्तसेवा
नाताळ सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे मडगाव बाजारपेठ नाताळाच्या विविध साहित्याने सजली आहे. व्यापाऱ्यांनी विविध प्रकारचे आकर्षक साहित्य बाजारात विक्रीसाठी आणले असून ग्राहकांनी खरेदीसाठी पसंती दर्शविली आहे. विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी आणि रंगरंगोटीसाठीची लगबग सुरू झाली आहे.
यावर्षी सजावटीच्या साहित्यात ८ ते १० टक्क्यांची वाढ झाली असली तरी खरेदीसाठीचा उत्साह कायम आहे. नाताळासाठी लागणारे साहित्य बाजारात दाखल झाले आहे. सजावटीचे सामान, विद्युत रोषणाईच्या माळा, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचे मुखवटे, स्नोबॉल, टोप्या, तयार गोठे आणि रंगीबेरंगी नक्षत्रे, चांदण्या, गोठ्यात ठेवण्यासाठी लागणाऱ्या मूर्ती आदी सामान दाखल झाले आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सजावटीच्या साहित्याच्या दरांमध्ये ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मडगाव बाजारात मोठ्या प्रमाणात सजावट साहित्य, फटाके खरेदीची दुकाने बाजार परिसरात थाटण्यात आली आहेत. विविध दराची नक्षत्रे, गोठे, व इतर साहित्य येथून नागरिक आवर्जून खरेदी करून घेऊन जात आहेत. तसेच दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खरेदी करावीत यासाठी ख्रिसमस ऑफर देत आहेत. सासष्टीतील विविध ठिकाणच्या बाजारपेठा सध्या नाताळाच्या साहित्याने सजल्या असून ग्राहकांचीही बाजारात मोठी गर्दी होत आहे. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
ख्रिसमस ट्री, तयार गोठे, सजावटीचे साहित्य, मिठाई तसेच इतर पूजासाहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. ख्रिस्ती बांधवांच्या घरी सणानिमित्त साफसफाई, रंगरंगोटी आणि सजावटीची कामे जोरात सुरू असून घरे, कपेल व क्रॉस आकर्षक पद्धतीने सजवली जात आहेत. याशिवाय तरुणाई गोठा सजावटीच्या कामात उत्साहाने सहभागी होत असून येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारित भव्य देखावे आणि नक्षत्रे तयार केली जात आहेत.
नाताळसाठी लागणाऱ्या करंज्या, केक, बेबिका, दोसे तसेच इतर गोड पदार्थ बनविण्यासाठी आवश्यक साहित्याचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. घराघरांत हे पारंपरिक पदार्थ तयार करण्याची लगबग सुरू असून, संपूर्ण परिसरात नाताळ सणाचा उत्साही आणि आनंदी माहोल निर्माण झाला आहे.