पणजी : मराठीला राजभाषा करण्यासाठी राजभाषा कायद्यात योग्य ती सुधारणा करण्यासंदर्भातील प्रश्न आपण मराठीप्रेमी जनतेतर्फे विधानसभेत प्रस्ताव मांडावा, अशा आशयाचे निवेदन मराठीप्रेमींनी आमदार, मंत्र्यांना दिले आहे.
सर्व आमदारांपर्यंत येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वी निवेदन देण्यात येईल. मराठी राजभाषा निर्धार समितीच्या, फोंडा येथे नुकत्याच झालेल्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळ व केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, स्थानिक प्रखंडातील मराठी कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रखंड कक्षेत समाविष्ट मतदारसंघातील आमदार, मंत्र्यांना विधानसभा अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी भेटून त्यांना मराठी राजभाषेच्या मागणीबद्दल निवेदन द्यावे, या मागणीसाठी आमदार, मंत्र्यांच्या भेटी ठिकठिकाणी घेण्याचे सत्र सुरू झाले आहे.
आतापर्यंत सुभाष शिरोडकर (शिरोडा), गणेश गावकर (सावर्डे), नीलेश काब्राल (कुडचडे), विश्वजित राणे (वाळपई), गोविंद गावडे (प्रियोळ), प्रेमेंद्र शेट (मये), चंद्रकांत शेट्ये (डिचोली), नीळकंठ हळर्णकर (थिवी), केदार नाईक (साळगाव) या आमदारांना मराठीप्रेमींनी निवेदन देण्यात आले आहे.