म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
गणेशपुरी, म्हापसा येथील एका माजी नगराध्यक्षांचा बंद बंगला चोरट्यांनी फोडून लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला मास्क बांधलेले पाच चोर कैद झाले असून, हीच टोळी या परिसरातील अन्य घरफोड्यांमध्येही सहभागी असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
शुक्रवार, दि. ४ रोजी मध्यरात्री ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. मात्र, रविवार, दि. ६ रोजी सकाळी घरकाम करणारी महिला कामावर आली असता घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडा असून कुलूप तोडल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने तत्काळ शेजारी तसेच म्हापसा पोलिसांना याची माहिती दिली.
माजी नगराध्यक्षांचे कुटुंबीय बंगला बंद करून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पोलिसांनी घराची पाहणी केली असता कपाटे फोडल्याचे तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त केल्याचे आढळून आले.
कपाटातील रोख रक्कम आणि दागिने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, शुक्रवारच्या रात्री चोरट्यांनी म्हापसा शहरात धुमाकूळ घातला होता. बाजारपेठेतील तब्बल १२ दुकाने फोडण्यात आली होती.