पणजी : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या मनीषा उसगावकर यांनी पक्षाच्या प्रदेश नेतृत्वावर टीका करताना, अलीकडे काँग्रेस कार्यालयात दिसणारे काही नवे चेहरे कदाचित आरएसएसच्या पार्श्वभूमीचे असतील, त्यांच्या प्रवेशाची छाननी कोण करत आहे, असा सवाल उपस्थित केला.
एका मुलाखतीत बोलताना उसगावकर म्हणाल्या की, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे काँग्रेसच्या हायकमांडसमोर अधिकाधिक लोक पक्षात दाखल होत असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांनी काँग्रेसची प्रस्तावित 'गोवा राखण यात्रा' वाळपईतून सुरू करण्याची मागणीही केली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव वाळपईतील प्रश्न का उपस्थित करत नाहीत, तसेच गेल्या साडेचार वर्षांत पक्षांतर केलेल्या आमदारांविरोधात काँग्रेसने ठोस भूमिका का घेतली नाही, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीने पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत मनीषा उसगावकर आणि शामिला सिद्धिकी यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून, पक्षातील शिस्त अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
मनीषा उसगावकर या गोवा प्रदेश काँग्रेसच्या माजी सरचिटणीस होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. शामिला सिद्धिकी या काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख होत्या.
उसगावकर आणि शामिला सिद्धिकी यांच्या हकालपट्टीबाबत विचारले असता प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, हा निर्णय पक्षाच्या शिस्तपालन समितीचा आहे. पक्षविरोधी कारवायांचे पुरावे समितीकडे असल्यामुळे कारवाई करण्यात आली असून, त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे की नाही, याचा निर्णय शिस्तपालन समिती आणि राज्य कार्यकारिणी घेईल.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटस्कर यांनी मनीषा उसगावकर आणि शामिला सिद्धिकी यांच्या हकालपट्टीच्या निर्णयावर आक्षेप घेतला. भाजपविरोधात भूमिका मांडणाऱ्यांना पक्षातून काढणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी वैयक्तिक टीका हे हकालपट्टीचे कारण ठरू शकत नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष असून मतभेद चर्चा आणि संवादातून सोडवले गेले पाहिजेत, हकालपट्टी करून नव्हे, असेही पाटस्कर म्हणाले.