goa assembly winter session  Pudhari
गोवा

Mandrem Assembly Constituency | मांद्रेत एकजुटीची चर्चा; उमेदवारीचा पेच कायम!

Mandrem Assembly Constituency | पार्सेकरांच्या संभाव्य पुनर्रवेशाकडे लक्ष; सोपटेंची दावेदारी, आरोलकरांची जनसंपर्कांतून बांधणी

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : निवृत्ती शिरोडकर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांद्रे मतदारसंघात राजकीय जुळवाजुळवीची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या संभाव्य भाजप पुनर्रवेशाची उमेदवारीची चर्चा पुन्हा केंद्रस्थानी आली आहे. माजी आमदार दयानंद सोपटे यांची दावेदारी आणि मगोचे विद्यमान आमदार जीत आरोलकर यांची पुढील भूमिका यामुळे मांद्रेतील लढतीचे स्वरूप कसे असेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

या घडामोडींमध्ये पार्सेकर, सोपटे, मांद्रेचे माजी सरपंच ॲड. अमित सावंत आणि बाळा उर्फ प्रशांत नाईक यांना एकत्र आणण्याच्या संभाव्य प्रयत्नांची चर्चा पुढे येत आहे. मात्र, अशी एकजुत प्रत्यक्षात आकार घेणार का, त्याचे नेतृत्व कोण करणार आणि उमेदवारीच्या प्रश्नावर सहमती होणार का, यावर तिचे राजकीय महत्त्व ठरनार आहे. पार्सेकरांचा पुनर्रवेश चर्चेत; उमेदवारीची हमी मात्र नाही
गोव्यात भाजपची संघटनात्मक उभारणी करण्यात लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे योगदान राहिले आहे. दोन वेळा प्रदेशाध्यक्षपद आणि मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या पार्सेकरांचा अनुभव व यामुळे त्यांच्या पुनर्रवेशाची चर्चा मांद्रेपुरती मर्यादित राहिलेली नाही.

ऑक्टोबरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांच्या पुनर्रवेशाबात चर्चा झाल्याचे सांगितले होते. मात्र, पुनर्रवेश म्हणजे उमेदवारीची हमी नव्हे, हेही पक्षाने स्पष्ट केलेले आहे.
सोपटेची दावेदारी; मागील चार नेत्यांची संभाव्य एकजूट
पार्सेकर आणि सोपटे यांच्या जोडीला ॲड. अमित सावंत व बाळा उर्फ प्रशांत नाईक आले, तर पंचायत पातळीवर संपर्क आणि विधानसभा स्तरावरील अनुभव यांची सांगड घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो. एकत्रित व्यासपीठ उभे करणे हा पहिला टप्पा असेल; त्यानंतर मतदारांचा विश्वास संपादन करणे ही खरी कसोटी ठरेल. त्यामुळे संभाव्य एकजुटीकडे आरोलकरांसमोरकील आव्हान म्हणून पाहता येईल.

मार्च २०२५ मध्ये मांद्रेतील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या जागेवर भाजपचा दावा कायम राहीली, अशी भूमिका मांडली होती. त्यावेळी त्यांनी सोपटे यांच्या कार्याचा उल्लेख केला होता. माजी आमदार दयानंद सोपटे यांच्यासाठी आगामी निवडणूक ही मांद्रे पुन्हा जिंकण्याची संधी ठरू शकते.

मतदारसंघातील संपर्क आणि भाजपमधील सक्रियतेच्या आधारावर त्यांचा दावा कायम आहे. मात्र, जागेवरील पक्षାचा दावा आणि उमेदवारीची अंतिम निवड या स्वतंत्र बाबी आहेत. पार्सेकर आणि सोपटे यांच्यात समन्वय निर्माण झाल्यास भाजपसमर्थक मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न बळकट होऊ शकतो. परंतु उमेदवारी एकच असल्याने दोन्ही नेत्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका हा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे.
जीत आरोलकरांचा भर जनसंपर्कावर

विद्यमान आमदार जीत आरोलकर यांनी युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, क्रीडापटू आणि विविध क्षेत्रातील नागरिकांसोबत संपर्क वाढवून आपली बाजू मजबूत करण्यावर भर दिला आहे. विकासकामांचा पाठपुरावा आणि स्थानिक उपक्रमांमध्ये सहभाग यांच्या माध्यमातून ते मतदारांशी नाते टिकण्याचा प्रयत्न करत आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आरोलकर मगोच्या उमेदवारीवर १०,३८७ मते मिळवून विजयी झाले होते.

भाजपचे दयानंद सोपटे यांच्यावर त्यांनी ७१५ मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे मागील निवडणुकीतील मर्यादित विजयार पाहता, आगामी लढतीत मते एकत्रीकरण आणि विभाजन या दोन्ही बाबी महत्त्वाच्या ठरू शकतात. आरोलकर निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT