Casinos  
गोवा

Mandavi River Casinos | मांडवीत सातव्या 'कॅसिनो'ची एन्ट्री! पणजी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद पेटला

Mandavi River Casinos | महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोध वाढणार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृतसेवा

पणजी शहराचे भूषण असलेल्या मांडवी नदीमध्ये नांगरण्यात आलेल्या सहा कॅसोनोंमध्ये आणखी एका भल्यामोठ्या कॅसिनो जहाजाची भर पडणार आहे. सदर मोठ्या कॅसिनोसह मांडवीतील सर्वच कॅसिनोना पणजीकरांचाच नव्हे तर इतर लोकांचाही विरोध सुरू झाला आहे. सध्या पणजी महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असून या पार्श्वभूमीवर या कॅसिनोंना जास्तच विरोध होत आहे.

पणजी महापालिकेची निवडणूक ११ मार्च रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज भरणे सुरू आहे, कॅसिनोंना वाढता विरोध पाहता सत्ताधारी पक्ष, सरकार व पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात कचाट्यात सापडले आहेत.

कॅसिनोमुळे जुगार संस्कृती वाढते, तरुण पिढी त्या व्यसनात अडकते, अनेकाची कुटुंबे कॅसिनोंमुळे उद्ध्वस्त झाल्याचे बोलले जात असताना दुसरीकडे सरकार वर्षाला कॅसिनोंद्वारे मिळणाऱ्या १६ ते १७कोटी रुपयाच्या महसुलासाठी कॅसिनोंच्या परवान्याचे पुन्हा पुन्हा नूतनीकरण करत आहे. यात भर म्हणून आता एक भले मोठे जहाज गोव्यात दाखल झाले असून त्याचा वापर कॅसिनोसाठी केला जाणार असल्याने लोकांचा कॅसिनोला विरोध वाढत आहे.

युवा नेते उत्पल पर्रीकर हे आज त्यांच्या पॅनेलचे उमेदवार ठरवण्यात व उमेदवारी भरण्यासाठी हवी असलेली कागदपत्रे जमा करण्यात व्यस्त होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच पणजीतील कॅसिनो विरोधातील भूमिका जाहीर केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी प्रतिक्रिया दिली नसली तरी भाजप पक्ष सत्तेवर असल्याने सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष या नात्याने सरकारच्या धोरणाला भाजप पाठिंबाच देईल, हे सर्वांना ज्ञात आहे.

पणजीच्या हिताचा निर्णय घेणार

ज्येष्ठ नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो म्हणाले, पणजी महापालिकेच्या अख्यत्यारित येणाऱ्या कॅसिनो कार्यालय परवानगी व इतर मुद्द्यांवर आमचे पॅनेल सत्तेवर आल्यानंतर योग्य तो व पणजीच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. सध्या तरी पणजीकरांनी भले मोठे जहाज कॅसिनोसाठी वापरण्यास जो विरोध केला आहे त्याला आपला पाठिंबा आहे.

कॅसिनोंमुळे गंभीर प्रश्न निर्माण

वाल्मिकी नाईक आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले की, गोवा हा संस्कारी भाजप सरकारकडून जगभरातील पर्यटन परिषदांमध्ये जुगार आणि अनैतिक कृत्यांचे ठिकाण म्हणून अधिकृतपणे प्रचार केला जात आहे. सरकारला खूप महसूल मिळतो हा दावा खोटा आहे. उलट, कार्यरत गेमिंग कमिशनर नसल्यामुळे हजारो कोटी रुपयांचा महसूल गळती होत आहे.

कॅसिनोंमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या आणि होणाऱ्या व्यवहारांची कोणतीही अचूक नोंद नसल्याने ही गळती वाढत आहे. कॅसिनोंमुळे गुन्हेगारी, अमली पदार्थांचा व्यापार, वेश्याव्यवसाय, वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, प्रदूषण, नदीची हानी, पर्यावरणीय नुकसान आणि इतर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याशिवाय, आग लागणे किंवा जहाज बुडणे यांसारखी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर गोव्यात कधीही न पाहिलेला मोठ्या प्रमाणावर जीवितहानीचा प्रसंग उद्भवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT