Mandar Surlkar murder case
पणजी : २००६ मधील गाजलेल्या मंदार सुर्लकर अपहरण व हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या तीन दोषींच्या मुदतपूर्व सुटकेचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा लाभ आरोपी रोहन धुंगट, रायन पिंटो आणि शंकर तिवारी यांना मिळाला आहे.
वास्को येथील प्रसिद्ध विकासक दीपक सुर्लकर यांचा मुलगा मंदार सुर्लकर याचा २००६ मध्ये खून झाला होता. या खुनामुळे राज्यात खळबळ निर्माण होऊन पोलिस यंत्रणाही हादरली होती. मंदारच्या वडिलांकडून ५० लाखांची खंडणी न मिळाल्याने अपहृत मंदारची त्याच्याच चार मित्रांनी हत्या केली होती. गळा आवळल्याने तसेच डोक्यात बेसबॉल बॅटने प्रहार केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह उत्तर गोव्यातील केरी येथील निर्जनस्थळी टाकून देण्यात आला होता.
या गुन्ह्यामुळे संपूर्ण गोव्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास पणजी पोलीस स्थानकाचे तत्कालिन पोलिस निरीक्षक महेश गांवकर यांनी केला होता. अनेक पोलिस पथके स्थापन करून तपास सुरू झाला होता. कोणतेही पुरावे नसल्याने या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान होते. घटनेच्या दिवशी मंदार याच्याशी संपर्क साधलेल्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला. या दरम्यान रोहन धुंगट, शंकर तिवारी, रायन पिंटो व अल सलहा बेग या चौघांना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत या प्रकरणाचा छडा लागला होता.
या प्रकरणाच्या तपासावेळी पोलिसांनी ठोस पुरावे गोळा केले. या प्रकरणातील चौथा आरोपी अल सलहा बेग याने माफीच्या साक्षीदार म्हणून अर्ज केला. पोलिसांनी त्याला मान्यता दिली. त्यानंतर त्याने मंदार सुर्लकर याच्या वडिलांकडे खंडणी मागण्यापासून ते मंदार याचा केलेला खून याची इत्यंभूत माहिती दिली व त्याची ही साक्ष न्यायालयासमोर इतर तिघा आरोपींना शिक्षा ठोठावण्यास पुरेशी ठरली होती. रोहन धुंगट, शंकर तिवारी व रायन पिंटो या तिघा आरोपींना सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर अल सलाहा बेग याला माफीचा साक्षीदार ठरवून सुटका केली. हे तिघे आरोपी कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. १४ वर्षे शिक्षेनंतर चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर कायद्यात सरकारकडे शिक्षा पूर्वसुटकेसाठी अर्ज करण्याची मुभा आहे.
मुदतपूर्व सुटकेसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोषींनी खटल्यात ठोठावलेला दंड भरल्याची नोंद घेतली होती. तर दुसरीकडे, मृत मंदार सुर्लकर यांचे वडील दीपक सुर्लकर यांनी दोषींच्या मुदतपूर्व सुटकेला विरोध दर्शवत न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केली होती. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने अखेर रोहन धुंगट, रायन पिंटो आणि शंकर तिवारी यांच्या मुदतपूर्व सुटकेला मंजुरी दिली.
२०१३ मधील गोव्यातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने माजी तेहलका संपादक तरुण तेजपाल यांना दोषी ठरवत सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेला निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द करून दणका दिला आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणात राज्य सरकारच्या अपीलाला यश मिळाले आहे.