उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्या सूचना, निर्देश
विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा
म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
म्हापसा शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि गर्दीच्या वेळी वाहतूक व्यवस्थापनाबाबत तोडगा काढण्यासाठी म्हापसा वाहतूक पोलीस, शाळा, महाविद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालयांच्या प्रतिनिधींची बैठक उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शाळा सुटण्यावेळी होणारी गर्दी यावर चर्चा करण्यात आली.
विशेषतः जेव्हा विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी एकाचवेळी बाहेर पडतात, त्याचे व्यवस्थापन करा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीला वाहतूक विभागाचे उपअधीक्षक सुदेश नार्वेकर, वाहतूक निरीक्षक मार्लोन डिसोझा यांसह अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण आणि वाहतूक सुरळीत करण्याबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी अनेक मुद्दे मांडले. शालेय विद्यार्थ्यांमधील समन्वय सुधारण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पालक-शिक्षक संघाचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी स्वयंसेवक आणि ट्रॅफिक वॉर्डन्सच्या भूमिकेवरही चर्चा झाली. त्यांची मदत घेतली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
याबाबत बैठकीनंतर आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बैठकीत प्रत्येक शैक्षणिक संस्थेतील ट्रॅफिक वॉर्डन्ससाठी वाहतूक शाखेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रशिक्षण सत्रांविषयीही चर्चा करण्यात आली.
शाळा, वाहतूक प्रशासन आणि स्वयंसेवकांतील उत्तम समन्वयाद्वारे मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता उपाययोजना केल्या जाणार आहेत.