Dance Video Viral Pudhari
गोवा

Video Viral: 'बाई वाड्यावर या', गोव्यात रशियन तरुणीसोबत महाराष्ट्रातील पुरुषांचा भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट्सचा पाऊस

Ksenia Asta Marathi Dance Video: गोव्यातील अरामबोल समुद्रकिनाऱ्यावर रशियन डान्सर क्सेनिया अस्ता यांनी 'बाई वाड्यावर या' या मराठी गाण्यावर डान्स केला.

Rahul Shelke

Ksenia Asta Marathi Dance Video: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर एका रशियन तरुणीचा मराठी गाण्यावरील डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत डान्स करणाऱ्या महाराष्ट्रातील पुरुषांच्या ग्रुपने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या ग्रुपच्या वागण्याचे अनेकजण कौतुक करत आहेत. तर काहींनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

या रशियन तरुणीचे नाव क्सेनिया अस्ता (Ksenia Asta) आहे. ती डिजिटल कंटेंट क्रिएटर, ट्रॅव्हल ब्लॉगर आणि डान्सर आहे. ती सध्या गोव्यातील अरामबोल परिसरात वास्तव्यास आहे. यूट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती आपल्या दैनंदिन आयुष्यातील क्षण, प्रवास आणि नृत्याचे व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

'बाई वाड्यावर या' गाण्यावर भन्नाट डान्स

या व्हिडिओमध्ये क्सेनिया अस्ता लोकप्रिय मराठी गाणे 'बाई वाड्यावर या' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गोव्यातील अरामबोल समुद्रकिनाऱ्यावर हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, यावेळी महाराष्ट्रातील पुरुषांचा एक ग्रुप त्यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. गाण्याच्या तालावर सर्वजण आनंदाने नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओमधील पुरुषांच्या ग्रुपने ठेवलेले अंतर आणि त्यांचा सहज वावर याकडे नेटकऱ्यांचे विशेष लक्ष गेले.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना क्सेनियाने 'Good morning at the beach in Arambol' असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पुरुषांच्या ग्रुपचं नेटकऱ्यांकडून कौतुक

एका युजरने या व्हिडिओचे कौतुक करत म्हटले की, 'मस्करी-मस्तीचा भाग असला, तरी या व्हिडिओतून महाराष्ट्राची संस्कृती आणि स्त्री-सुरक्षेचा एक सुंदर संदेश दिसतो. मराठी गाण्यावर नाचताना पुरुषांनी राखलेलं अंतर, त्या विदेशी महिलेचा त्यांच्यात वावरताना दिसणारा आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना, हेच महाराष्ट्राचं संस्कारशील रूप आणि महाराष्ट्र धर्म आहे' असे त्याने म्हटले.

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, सुरक्षित अंतर राखून सर्वांनी डान्सचा आनंद घेतला, हे खूप छान आहे. समोरच्या व्यक्तीलाही आनंद घेता यावा, असे व्यक्तिमत्त्व असणे महत्त्वाचे आहे. तर आणखी एका युजरने मजेशीर प्रतिक्रिया देत, 'तो बसून नाचतोय, त्याच्या बायकोला दाखवा,' असे म्हटले आहे.

एका रशियन तरुणीने मराठी गाण्यावर केलेल्या या डान्सने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. मराठी गाण्यांची लोकप्रियता आणि गोव्याच्या बीचवर रंगलेला हा अनोखा डान्स सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT