मडगाव : पुढारी वृत्तसेवा
प्राचार्याच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कुशावती जिल्ह्यातील त्या उच्च माध्यमिकच्या दुसऱ्या तुकडीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या वर्गातील ४३ विद्याथ्यापैकी १७ विद्यार्थ्यांना नापास केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तीन विद्यार्थ्यांचा निकालच दिला गेला नाही.
नापास झालेले सर्वच विद्यार्थी लैंगिक शोषणाचे बळी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निकाल जाहीर न झाल्याचे वृत्त 'पुढारी'त प्रसिद्ध होताच शाळा प्रशासनाने घाईघाईने अकरावीच्या एका तुकडीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला, तर दुसऱ्या वर्गाचा निकाल तयार नसल्याचे सांगत तो शनिवारी जाहीर केला.
त्याचवेळी एका शिक्षिकेने वर्गात येऊन, अर्ध्याहून अधिक विद्यार्थी नापास झाल्याने त्यांना बारावीत प्रवेश मिळणार नसल्याचे सांगितल्याने विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले. नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सविस्तरपणे निकाल दाखविण्याची मागणी केली असता, सविस्तर निकाल दाखवता येणार नाही, असे सांगून त्यांना शाळेतून थेट जाण्यास सांगितले.
त्यामुळे पालक संतापले असून, पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही इयत्ता १२ वीसाठी सदर उच्च माध्यमिकमध्ये प्रवेश प्रक्रिया केलेली नाही. त्या प्राचार्याच्या गैरकृत्याच्या विरोधात आवाज उठवला म्हणूनच आपली धमकी खरी करण्यासाठी आमच्या मुलांना नापास केल्याचे पालकांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.
प्राचार्य आपली गैरकृत्ये लपविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असे एका विद्यार्थ्याच्या आईने 'पुढारी'शी बोलताना सांगितले. नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्यासाठी अर्ज मागितले असता, हे अर्ज देखील देण्यास शाळा व्यवस्थापनाने नकार दिला.