प्रातिनिधिक छायाचित्र.  File photo
गोवा

Goa Road Accident | कुवैतला परतण्यापूर्वीच युवकाला मृत्यूने गाठले

Goa Road Accident | रस्त्यावर चुकीच्या बाजूने पार्क करून ठेवण्यात आलेल्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकून शेल्डे येथील फ्रान्सिस्को दुर्मिंग डायस (३५ वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला आई-वडिलांचा एकमेव आधार असलेला फ्रान्सिस्को सुट्टीच्या निमित्ताने आई वडिलांची भेट घेण्यासाठी कुवेतवरून गोव्यात आला होता.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

रस्त्यावर चुकीच्या बाजूने पार्क करून ठेवण्यात आलेल्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकून शेल्डे येथील फ्रान्सिस्को दुर्मिंग डायस (३५ वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला आई-वडिलांचा एकमेव आधार असलेला फ्रान्सिस्को सुट्टीच्या निमित्ताने आई वडिलांची भेट घेण्यासाठी कुवेतवरून गोव्यात आला होता.

येत्या सोमवारी त्याची कुवेतसाठी विमानाचे तिकीट होते. मात्र, त्यापूर्वीच त्याला मृत्यूने कवटाळले. ही दुर्घटना मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान घडली. सविस्तर माहितीनुसार, त्याच्या दुचाकीची धडक रस्त्यावर पार्क करून ठेवण्यात आलेल्या ट्रॅक्टरला बसली. अपघात घडला तो रस्ता अतिशय अरुंद आहे.

मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी हा रस्ता फोडण्यात आला आहे. त्यावरून प्रवास करतांना दुचाकीस्वारांची अक्षरशः तारांबळ उडत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर चुकीच्या बाजूने पार्क करून ठेवण्यात आलेला ट्रॅक्टर फ्रान्सिस्को याच्यासाठी काळ ठरला.

बाजारातून घरी येत असताना ट्रॅक्टरला त्याची धडक बसली. फ्रान्सिस्को याच्या घरची स्थिती बेताची आहे. त्याला तीन बहिणी असून त्यांची लग्नेही झालेली आहेत. वृद्ध आई-वडिलांचा तो एकमेव आधार होता.

आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी त्याने आखाताचा रस्ता धरला होता. त्याचा नातेवाईक जोएल मोराईस यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुवेत येथे तो चालक म्हणून काम करत होता. आताच कुठे त्याच्या घरची परिस्थिती सुधारत चालली होती. त्याने नुकतेच घरही बांधले होते.

विवाह करून घरात संसार थाटण्याचे त्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले. जोएल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आई-वडिलांसोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी आलेला फ्रान्सिस्को दोन महिन्यांनी सुट्टी संपवून सोमवारी पुन्हा कुवेतसाठी निघणार होता. केपे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी तपास सुरू असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT