South Goa Drug Bust | 1 कोटी 20 लाखांचा अमलीपदार्थ दक्षिणेत जप्त
मडगाव : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी कारवाईत तब्बल १ कोटी २० लाख ८६ हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत ४३१ ग्रॅम व १११.२ ग्रॅम चरस, ३७.९ ग्रॅम एमडीएमए तसेच २२३.३ ग्रॅम कोकेन असा मोठ्या प्रमाणातील साठा हस्तगत करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये केवळ कोकेनची किंमत १ कोटी ११ लाख रुपयांहून अधिक आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी व्यक्त केली आहे. ते दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
वर्मा म्हणाले, पहिल्या कारवाईत पोलिसांनी ४३१ ग्रॅम चरस जप्त केला असून त्याची बाजारभावानुसार किंमत ४ लाख ३१ हजार रुपये आहे. यात १३.५ ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १ लाख ३५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच २४.४ ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आला असून त्याची किंमत २ लाख ४४ हजार रुपये आहे. दुसऱ्या कारवाईत १११.२ ग्रॅम चरस जप्त केला असून त्याची किंमत १ लाख ११ हजार रुपये आहे. तिसऱ्या कारवाईत पोलिसांनी २१९.९ ग्रॅम कोकेन जप्त केला असून त्याची किंमत तब्बल १ कोटी ९ लाख ९५ हजार रुपये आहे.
सर्व जप्त अमलीपदार्थांची एकूण किंमत १ कोटी २० लाख ८६ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थांचा स्रोत, वाहतूक व विक्री करणाऱ्या मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.
पाचजणांना अटक
याप्रकरणी दीपू सिंग (वय २९) मूळ रहिवासी केरळ, अरुण के. एम. मोहन (वय २८) मूळ रहिवासी केरळ, वोल्टर फर्नांडिस (वय ४९) मूळ रहिवासी केरळ तसेच सुमित बांदेकर (वय ३२) मूळ रहिवासी काणकोण व ओनयाएचोले फ्रायडे (वय ४७) या नायजेरियन संशयिताला अटक करण्यात आली आहे.


