सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
मडगाव रेल्वे स्थानकानजीक उभ्या करण्यात आलेल्या मडगाव-पनवेल विशेष गाडीच्या एका डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत रेल्वेचा एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवाने, दुर्घटना घडली तेव्हा गाडीत कोणीही प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मडगाव अनिशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
मडगाव रेल्वे स्थानकावर उभ्या केलेल्या रेल्वे गाडीच्या डब्याला आग लागल्याची ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. ही एक विशेष ट्रेन असून ती शनिवारी मडगाव जंक्शनवरून पनवेलच्या दिशेने रवाना होणार होती.
आगीची माहिती मिळताच स्थानकावरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने उपलब्ध असलेल्या १४ अग्निशमन सिलिंडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही. घटनेची माहिती मिळताच मडगाव अनिशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
रेल्वेगाडीवर पाण्याचा मारा करण्यापूर्वी सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे मार्गावरील २५ केव्ही क्षमतेची उच्च दाबाची वीजवाहिनी बंद करण्यात आली. तसेच, इंजिनच्या लगतच्या डब्याला आग लागल्यामुळे इतर डब्यांपर्यंत आग पसरू नये, यासाठी तो डबा तातडीने वेगळा करण्यात आला. कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी बाजूला उभी असल्यामुळे आणि त्यात कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली आहे. चौकशी समितीच्या पाहणीनंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल.
कुणीतरी मुद्दामहून आग लावल्याचा संशय
सदर रेल्वेगाडी रेल्वे स्थानकाच्या आऊटर परिसरातील ट्रॅकवर उभी करण्यात आलेली होती. प्राथमिक तपासणीनुसार, या डब्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शॉर्ट सर्किट होण्याची तांत्रिक शक्यता नाही. त्यामुळे ही आग लावली असण्याची शक्यता दाट आहे. चौकशीनंतरच या घातपातामागील खरे कारण समोर येईल, असे रेल्वे उपप्रबंधक तथा वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी स्पष्ट केले.