मडगाव : पुढारी वृत्तसेवा
हिवाळ्यात गावठी गड्ढे, वांगी, चिटकी, लाल रताळी यांसारख्या भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेषतः गावठी वांगी अनेक ग्राहकांच्या आवडीची असल्याने ती महाग असूनही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहेत.
त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना हिवाळी पिकांमधून चांगला फायदा मिळत असल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात गावठी वांगी ८० ते १०० रुपये प्रती नग दराने विकली जात असूनही त्यांना चांगली मागणी आहे.
चव, दर्जा आणि घरगुती वापरासाठी उपयुक्त असल्यामुळे ग्राहक या भाज्यांना प्राधान्य देत आहेत. राज्यात हंगामानुसार भाज्यांची लागवड केली जाते. पावसाळ्यात कारली, काकडी, घोसाळी, पडवळ, भेंडी, दुधी या भाज्यांचे पीक घेतले जाते, तर हिवाळ्यात वांगी, गड्डे, लाल भाजी, मुळा, चिटकी, पालक आदी भाज्यांची लागवड केली जाते.
त्यामुळे वर्षभर बाजारात विविध प्रकारच्या ताज्या भाज्या उपलब्ध होत असतात. दरम्यान, बाजारात अळू माडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मध्यम आकाराची अळू माडी ८० ते १०० रुपये प्रति नग दराने विकली जात असून, मोठ्या आकाराची माडी १५० ते २०० रुपये दराने खरेदी केली जात आहे.
गावठी भाज्यांना पसंती
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामानिमित्त विविध पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केली होती. सध्या लाल भाजी, मुळे तसेच काही प्रमाणात भेंडी आणि गवार बाजारात दाखल झाल्या असून, नागरिकांचा खरेदीकडे चांगला कल आहे. मात्र, राज्यात कांदे, बटाटे व इतर काही भाजीपाला अद्याप महागच असून, गेल्या दोन आठवड्यांपासून टोमॅटोच्या दरात काहीशी घट झाली आहे.