मडगाव : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंसह भाज्या आणि किराणा मालाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. तांदूळ, मैदा, विविध डाळी, साखर यांसोबतच कांदा, टोमॅटो, कोथिंबीर यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले असून बाजारात महागाईचा फटका स्पष्टपणे जाणवत आहे.
सध्या कांदा व टोमॅटोचे दर ३५ ते ४५ रुपयांच्या पुढे गेले असून सर्व प्रकारच्या डाळी ११० ते १८० रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. परिणामी रोजच्या जेवणाच्या ताटातील पदार्थही महाग झाले असून गृहिणींना घरखर्च सांभाळणे अवघड झाले आहे.
नाताळ आणि नववर्ष हे सण जवळ आले असताना भाज्या व किराणा साहित्याच्या किमती वाढल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात दरवाढ होते, मात्र यंदा ही वाढ अधिक जाणवत असल्याने सण साजरे करताना सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः लसूण आणि आलेच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे.
बाजारात लसूण ३५० ते ४०० रुपये किलो दराने विकला जात असून आले १५० ते १८० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. याशिवाय गावठी भाज्यांच्या किमतीही गेल्या चार दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांना खरेदी करताना मोठी किंमत मोजावी लागत आहे.
पणजीत मार्केटमध्ये टोमॅटो प्रतिकिलो ६० रु. दराने, तर फलोत्पादनकडे ५३ रु. किलो दराने टोमॅटो विकले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी फलोत्पादनकडे ५९ व ५६ रु. किलोचा दर असूनही मार्केटमध्ये टोमॅटोचा दर ६० ठेवण्यात आला होता.
फलोत्पादनने दर वाढवला, तरीही मार्केटमधील व्यापाऱ्यांनी वाढवला नव्हता. याबाबत विचारलें असता, आम्ही टोमॅटोचा दर वाढवला तर आमच्याकडे ग्राहक फिरकणार नाहीत. त्यामुळे आवश्यक नसताना दर न वाढवण्याचे ठरवले आहे, असे त्यांनी सांगितले. फलोत्पादनकडे टोमॅटोचा दर उतरत आहे. कांद्याचा भाव मात्र स्थिर म्हणजे ३९ रु., आहे, तर मार्केटमध्ये बटाट्याचा ३१ रु कांदा, बटाटा ४० रु. किलो दराने विकला जात आहे. गाजराचा दर बाजारात ८० रु. तर फलोत्पादनकडे 1 स्थिर म्हणजे ४९ रु. किलो आहे.
भाज्यांचे दर (प्रतिकिलो रु.)
कांदा ४५, टोमॅटो ३८, लसूण ३५० ते ४००, आले १५० ते १८०, कोबी २८, गाजर ५०, ग्रीन पीस १२० ते १५०, फरसबी ७०, फ्लॉवर ४०, मिरची ८० ते १००, बटाटा ४०